जिंतूरमध्ये अमृत संस्थेची बैठक उत्साहात
विविध लाभांपासून वंचित खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कार्यक्रम
जिंतूर : जिंतूर येथे संचारेश्वर प्राथमिक विद्यालयात अमृत या संस्थेची बैठक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस अमृतमित्र किशोर देशपांडे, रवी पेशकर यांच्यासह जिंतूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री.नाईक यांनी प्रास्ताविक केले. अमृतचे परभणी जिल्हा उपव्यवस्थापक अनिरुध्द काटे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून बैठकीचा हेतू विशद केला. अमृतचे विभागीय व्यवस्थापक दीपक जोशी यांनी अमृतच्या स्थापनेचा उद्देश सविस्तरपणे सांगितला. राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जाती, ज्यांना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था, महामंडळे यांचेकडून लाभ मिळत नाही त्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सन २०२३ मध्ये अमृतने कौशल्य विकास प्रशिक्षणे, कृषी आधारित उद्योग व्यवसाय स्थापनेसाठी प्रशिक्षणे, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी अर्थसहाय्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अशा योजनांतून अमृतच्या लक्षीत गटातील लाभार्थी यांना लाभ पोहोचवला असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी अमृतने आणखी अनेक योजना नव्याने सुरू केल्या आहेत. ज्यात किशोर विकासापासून समाजातील विविध स्तरापर्यंत अमृत पोहोचणार आहे.
यापूर्वी सुरू असलेल्या शैक्षणिक अर्थसहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहनपर योजना, कौशल्य विकास व कृषी आधारित उद्योग व्यतिरिक्त स्वयंरोजगार व उद्योगाभिमुख कौशल्य विकासासाठी १० वी उत्तीर्ण, आयटीआय ते पदवीधर विद्यार्थांसाठी तांत्रिक कौशल्य विकासासाठी इंडो जर्मन टूल रूम या संस्थेशी अमृतने सामंजस्य करार केला आहे. ज्या कोर्सेसना बाजारात मागणी आहे, असे १५ निवासी कोर्स व ३० अनिवासी कोर्स यासाठी निवडले आहे. तेथे इच्छुक लाभार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व आवडीनुसार निवासी वा अनिवासी प्रशिक्षणे देण्यात येतील. त्यासाठी शैक्षणिक शुल्क व निवास शुल्क अमृत देईल. त्याच धर्तीवर, संगणक क्षेत्रातील मान्यवर संस्था सी-डॅकयांचेकडून त्या क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षणे लाभार्थीना देण्याचे अमृत संस्थेने नियोजित केले आहे.
कृषी क्षेत्रात व इतरत्र ड्रोनचा वाढता वापर व त्यासाठी केंद्र व राज्यशासनाची भूमिका विचारात घेता ड्रोन वापराचे प्रशिक्षण राहुरी कृषी विद्यापीठाचे माध्यमातून देण्यात येणार आहे, असे प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर यांना केंद्र शासनाचे डीजीसीएचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल व ते स्वतःचा व्यवसाय किंवा सेवा केंद्र सुरू करू शकतील. तसेच एमसीईडीसोबत सूर्यमित्र, अमृत बेकरी, आयात-निर्यात, आर्थिक साक्षरता त्यासाठी प्रशिक्षण शुल्क व निवास खर्च अमृत करेल. या शिवाय ज्यांचेकडे उद्योग व्यवसायाच्या काही अभिनव कल्पना आहेत त्यांना विकसित करून नवोद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अमृतने बिझनेस इंक्यूबेशनची योजना आणली आहे. त्यात अशा नवोद्याजकांना तज्ञांचे सर्वांगीण मार्गदर्शन मिळेल. अशा उमेदवारास त्याच्या आकांक्षापूर्तीसाठी पूर्णवेळ प्रयत्नशील राहण्यासाठी अमृततर्फे एक वर्ष फेलिशिप दिली जाईल.
तज्ञांचे मार्गदर्शनसाठी अमृतने शासकीय अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विद्यापीठ यांचे सोबत सामंजस्य करार केला असून त्यात इतरही संस्थांचा अंतर्भाव केला जाईल. या प्रशिक्षित कौशल्यधारक लाभार्थ्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ जरुरीचे असते. त्यासाठी अमृतने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही योजना आणली आहे. यासाठी लाभार्थ्यांना कर्जाची परतफेड नियमितपणे बंधनकारक राहील. यांसह अमृतच्या सर्व योजनांची तपशीलवार माहिती श्री.जोशी यांनी दिली. उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्न व शंकांचे त्यांनी समाधान केले. उपस्थित सर्वांना त्यांनी अमृतच्या प्रचार व प्रसिध्दीचे आवाहन केले व अमृतच्या लक्षित गटातील लाभार्थ्यांच्या विकासासाठी हातभार लावण्याची विनंती केली. कार्यक्रमातील सर्व उपस्थितांनी श्री.जोशी यांनी दिलेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अनिरुद्ध प्रमोद काटे यांनी आभार मानले. असेच माहितीपूर्ण कार्यक्रम जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.