पाच ऑस्करसह ‘अनोरा’ची बाजी
सर्वोत्तम अभिनेत्री मायकी मॅडिसन, अभिनेता अड्रियन ब्रॉडीला पुरस्कार
वृत्तसंस्था, लॉस एंजलिस आधुनिक जगातील सिंड्रेलाच्या कथा म्हणून पडद्यावर आलेल्या ‘अनोरा’ या चित्रपटाला ९७व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. या चित्रपटाने सर्वाधिक पाच पुरस्कार मिळवले. दिग्दर्शक शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी मायकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘द ब्रुटलिस्ट’साठी अड्रियन ब्रॉडी याला मिळाला. हा त्याचा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे.
रविवारी लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या रंगमंचावर पुरस्कारांबरोबरच जागतिक प्रश्न, राजकारणांविषयी मते मांडली गेली. कोनन ओब्रायन याने केलेल्या खुसखुशीत सूत्रसंचालनामुळे यंदाचा सोहळा अधिक प्रेक्षणीय झाला. कोननने भारतीय प्रेक्षकांसाठी हिंदीतून दोन ओळींचे निवेदनही केले. मात्र, भारतीयांची एकमेव अशा असलेला ‘अनुजा’ या लघुपटाचा पुरस्कार हुकला.
अत्यंत कमी बजेटमध्ये तयार केलेल्या ‘अनोरा’ ने अनपेक्षित बाजी मारून पुरस्कारांवर मोहोर उमवटत नवे विक्रम नोंदवले. एका स्ट्रीप क्लबमधील तरुणीची रशियन श्रीमंत तरुणाबरोबरची प्रेमकथा अन्य सिनेमांच्या शर्यतीत उजवी ठरली. ‘अ रिअल पेन’साठी कायरन कल्किन याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा आणि झोई सल्डानाला “एमिलिया पेरेज’ साठी सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर प्रथमच ब्राझीलच्या ‘आय एम स्टिल हिअर’ या चित्रपटाला मिळाला आहे. ‘फ्लो’ला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटाचा, तर ‘इन द शेंडो ऑफ द सायप्रस’ला अॅनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर मिळाला. कॉस्च्युम डिझायनर पॉल टॅझवेल हा ऑस्कर जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय वेशभूषाकार ठरला.
तुरुंगवासामुळे अभिनेत्री ऑस्करला मुकली
दरम्यान, इराणची अभिनेत्री सोहेला गोलेस्तानी हिला यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला पोहोचता आले नाही. २०२२मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर पेटलेल्या आंदोलनामुळे विभक्त झालेल्या कुटुंबावर आधारित ‘द सीड ऑफ द सेक्रेड फिग’मधील प्रमुख भूमिका तिने केली आहे. त्याबद्दल तिच्यावर खटला सुरू होता. एप्रिलमध्ये तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिला ७४ चाबकाचे फटके आणि एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
विक्रमी बेकर
‘अनोरा’चे दिग्दर्शक शॉन बेकर यांनी चार वैयक्तिक ऑस्कर जिंकले. १९५४मध्ये चार वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ऑस्कर जिंकणाऱ्या वॉल्ट डिस्नी यांच्या विक्रमाशी बेकर यांनीबरोबरी केली आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात सिनेमा पाहा, असे आवाहन केले; तसेच निर्माते, वितरक यांना मोठ्या पडद्यासाठी चित्रपट बनवत राहा, अशी गळ घातली.
मंचावर राजकारणाची चर्चा
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना अनेकांनी राजकीय ध्येयधोरणांविषयी आपली
मते खुलेपणाने मांडली. काहींनी या रंगमंचावर जगातील संहारक राजकारणाचा निषेध केला, तर काही नरसंहार थांबवण्याचे आवाहन केले. शिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील नेत्यांनाही टोले लगावण्यात आले.
‘नो अदर लँड’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. युवल अब्राहम, बासेल अद्रा, हमदान बलाल आणि रेचल झोर यांच्या ‘नो अदर लँड’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. इस्रायली आणि पॅलेस्टिनी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन बनवलेला हा माहितीपट आहे. वॉल्टर सॅलेस दिग्दर्शित ‘आय एम स्टिल हिअर’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. ब्राझीलच्या लोकशाही आणि राजकीय धोरणांवर चर्चा करणारा हा चित्रपट आहे.
CRDIT -MaTa- GETTY IMAGAE BBC