सेलूतील ‘राजस्थानी मल्टिस्टेट’ची झाडाझडती
तिजोरीसह कागदपत्रे, साहित्य सेलू पोलिसांकडून ताब्यात
परभणी : इमारतीच्या मूळ मालकास जागा रिकामी करून देण्याच्या उद्देशाने, ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी सेलू ( जि.परभणी) येथील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखा कार्यालय इमारतीचे कुलूप उघडून पोलिसांनी झाडाझडती केली असून तिजोरी, संगणक व महत्त्वाच्या कागदपत्रांसह अन्य साहित्य सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चार मार्च रोजी येथील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखा कार्यालयाच्या इमारतीचा नामफलक खाली उतरविण्यात आला. आरोपी चंदूलाल बियाणी याच्या समक्ष इमारत रिकामी करून झाडाझडतीची कार्यवाही सुरू झाल्याचे कळताच ग्राहकांनी सोसायटीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. काही ग्राहक बियाणीस वैयक्तिक गार्हाणी मांडून ठेवी परत कधी देणार अशी विचारणादेखील करत असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी बँकेतील तिजोरी, संगणक, फाईल, कागदपत्रे, फर्निचर आदी सर्व वस्तू नोंद घेऊन ताब्यात घेतल्या आहेत.मूळ मालकास इमारत रिकामी करून देण्यात आली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार सेलू पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यास बीड कारागृहातून सेलू पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. २६ फेब्रुवारी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता पुन्हा त्याची रवानगी कारागृहात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुदत संपूनही ठेवीचे ४ लाख ५० हजार रुपये परत दिले नसल्याने अभय सुभेदार (रा. सेलू जि.परभणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारीला सेलू पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. फिर्यादी अभय सुभेदार यांच्यावतीने ॲड.एल.एच.खोना यांनी काम पाहिले. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
तक्रारदारांचे जवाब नोंदवणे सुरू : राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा सेलू येथे ग्राहकातील आणखी कोणाची फसवणूक झाली, असेल तर त्यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर फसवणूक झालेले ग्राहक सेलू पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर करीत असून त्यांचे जवाब पोलिस ठाण्यात नोंदवून घेतले जात आहेत.