जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे, बस्सी एसीबीच्या जाळ्यात
दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, परभणीत एसीबीच्या पथकाची कारवाई, क्रीडा क्षेत्रात खळबळ
परभणी : परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर व क्रीडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी, २७ मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातच परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मानवत येथील तक्रारदाराला एका क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच जलतरण तलाव बांधकाम मान्यतेसाठी कविता नावंदे यांनी २ लाख रुपये व बस्सी यांनी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारकर्त्याने नावंदे यांना क्रीडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष १ लाख रुपये सुपूर्द केले. परंतु, तक्रारदाराला उर्वरित दीड लाख रुपयाची रक्कम द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबी विभागाने गुरुवारी सापळा रचला आणि नानकसिंह बस्सी यास ५० हजार रुपये व जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे यांना १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहात ताब्यात घेतले. या पथकाने तातडीने दोघांचीही झडती घेतली. त्यात नावंदे यांच्या पर्समधून लाचेची १ लाख रुपये व त्या व्यतिरिक्त ६ हजार रुपयांची रक्कम व मोबाईल, तर बस्सी यांच्याकडून लाचेची ५० हजार रुपये व त्या व्यतिरिक्त १ हजार ८३० रुपये रोख रक्कम व मोबाईल जप्त केला. नावंदे यांच्या परभणीतील निवासस्थानाची झडती घेतली असता, त्या ठिकाणी १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम सापडली. या खात्याच्या पथकाने नावंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील निवासस्थानाची, तर बस्सी याच्या नांदेड येथील निवासस्थानाची झडती सुरु केली होती. दरम्यान, या दोघा आरोपींविरोधात परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक अलताफ मुलानी, एएसआय निलपत्रेवार, रविंद्र भुमकर, अनिरुध्द कुलकर्णी, सीमा चाटे, अतूल कदम, नामदेव आदमे, राम घुले, शाम बोधणकर, नरवाडे यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, क्रीडा विभागातील गैरप्रकारांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी मांडलेली लक्षवेधी चर्चेत असताना, परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे व बस्सी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. कविता नावंदे यांचा मनमानी कारभार सुरू असून खेळाडूंना सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्या गैरकारभाराची विभागीय चौकशी करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी शिवसेना उबाठाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनीही अधिवेशनात केली होती. तसेच क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर नावंदे व बस्सी यांच्यावरील कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.