
परभणी : जिल्ह्यातील आघाडीच्या नागरी बँकांपैकी एक असलेल्या सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला सलग सातव्यांदा ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्काराने गुरुवारी, दोन जून रोजी लोणावळा येथे सन्मानित करण्यात आले.
अविज पब्लिकेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात सीजीएमआरबीआयचे डी.जी.काळे, ग्लेक्सी इंनम्हां पुणेचे संचालक अशोक नाईक, चीफ ऑडिटर अविनाश शिंत्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, व्यवस्थापक दत्तात्रय पौळ, राजेंद्र आडळकर, कन्हैयालाल बालचंदानी, दत्तराव आंधळे, सुभाषराव चव्हाण, गंगाधर आडळकर, शेख इम्रान अहेमद, सुनील आडळकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
गेल्या २७ वर्षांपासून आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन, पारदर्शकता, सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, अत्याधुनिक सेवा सुविधा या कार्याबद्दल देशातील नागरी सहकारी बँकेच्या १७६ ते २०० कोटी रुपये ठेवी गटातून बँकेला २०२१ या वर्षातील हा सन्मान बहाल करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षा अखेर बँकेला चार कोटी २७ लाख रुपयांचा सकल, तर एक कोटी ८५ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप केले जात आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीत खातेदार, शेतकरी, कामगार, ग्राहक, कर्जदार, कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळाचे मोठे योगदान आहे. भविष्यातही अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देऊन ‘आपली बँक’ अधिक समृद्ध करण्यासाठी साईबाबा बँक कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अध्यक्ष हेमंतराव आडळकर, संचालक पवन आडळकर यांनी दिली. दरम्यान, बँकिंग सेवा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या बँको पुरस्काराने सलग सातव्यांदा साईबाबा बँकेला सन्मानित करण्यात आल्याने सेलू शहराच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात असून बँकेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.