सेवा संकल्प शिबिराची सेलूत जय्यत तयारी
महाआरोग्य शिबिरासह तीन दिवस विविध कार्यक्रम, ५२ स्टॉल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय योजनांची मिळणार माहिती
सेलू जि.परभणी : सार्वजनिक आरोग्य, ऊर्जा, पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जनतेपर्यंत सेवा पुरविणे तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्याच्या उद्देशाने आयोजित तीन दिवसीय सेवा संकल्प शिबीर अभियानाचा शुभारंभ मंगळवारी, ८ एप्रिल रोजी सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होत आहे. याची जय्यत तयारी झाली आहे.
या संदर्भात सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी विशेष कार्यकारी अधिकारी राहुल देशपांडे, मेघराज देवरे, चेतन भिंगारे, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद घोंगडे, मुख्याधिकारी युवराज पौळ, मुकुंद आष्टीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच दरडोई उत्पन्न हे राज्यातील तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे, सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि विभागीय जनजागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी, ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन आहे.
तीनही दिवसीय शिबिरात सरकारच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे ५२ स्टॉल्स, उत्पादक पुरवठा धारक कंपन्यांची उत्पादने, जनसंवाद सत्रे, आरोग्य तपासणी शिबीर आणि विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण आहे.
याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार राजेश विटेकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, छत्रपती संभाजीनगर महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक राहूल गुप्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी राहूल गिते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी ‘कृषी, ऊर्जा व आरोग्य’ या विषयावर शेतकरी मार्गदर्शन शिबीर आहे.
१० एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर, महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन आहे. दरम्यान, आरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील आवश्यक त्या आरोग्य सुविधा तसेच आयुष्यमान भारत कार्ड देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. डोळ्यांच्या तपासणीनंतर कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत चष्म्याचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी तयारीचा आढावा घेतला आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.