वाढदिवसाच्या शुभेच्छा वही-पेन-पुस्तके अन् वृक्षारोपणाने
परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची हितचिंतकांना साद
सेलू/परभणी : राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा गुरूवारी, १० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हितचिंतकांना आणि सहकारी बंधू भगिनींना एक जाहीर आवाहन केले आहे. या वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना बॅनर-हार-तुरे-शाल-श्रीफळ किंवा भेटवस्तू न देता, वही-पेन अर्थात शाळापयोगी वस्तू भेट म्हणून द्याव्यात, ज्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांना भरारी घेण्याचे पंख देतील, तसेच वृक्ष लागवड करून आपल्या भारताचे हिरवागार नंदनवन करण्यासाठी हातभार लावावा, अशी साद घातली आहे.
पालकमंत्री बोर्डीकर यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात मी कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे माझा वाढदिवस अर्थात १० एप्रिल हा दिवस आपण सर्वजण एखाद्या उत्सवप्रमाणे साजरा करत आहात. आपले माझ्यावर व बोर्डीकर कुटुंबावर असलेले प्रेम या दिवशी आपल्या शब्दसुमानांनी, आपल्या भेटवस्तू व शुभेच्छांनी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आला आहात.
आपल्या याच प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्याने मी आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास करू शकले आहे. पद मिळाली की सोबत जबाबदारी देखील येते, आयुष्यात येणारं प्रत्येक नववर्ष काही ना काही घेऊन येत असत, अनेक संकल्प पूर्तीस जातात अनेक नवे संकल्प केले जातात. याच अनुषंगाने या वर्षी मी एक संकल्प केला आहे तो म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी देणं लागतो, ते देणं निसर्गाचं आहे, पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्याचं आहे.
म्हणून या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते, या वर्षी आपण मला शुभेच्छा देत असताना बॅनर-हार-तुरे-शाल-श्रीफळ किंवा भेटवस्तू न देता वही-पेन अर्थात शाळापयोगी वस्तू भेट म्हणून द्याव्यात ज्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांना भरारी घेण्याचे पंख देतील, वृक्ष लागवड करून आपल्या भारताचे हिरवागार नंदनवन करण्यासाठी हातभार लावावा, या छोट्या कृतींमधून येणाऱ्या पिढ्यांना आपण बरच काही देऊ शकतो. आपलं प्रेम मी जाणते, आपण माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत नक्कीच या वर्षी हार तुरे टाळून वही पुस्तके व वृक्षारोपण करत माझा वाढदिवस साजरा कराल हीच अपेक्षा व्यक्त करते, असे पालकमंत्री यांनी म्हटले आहे.