महावितरणच्या सेलू विभागाचे लोकार्पण, पाच तालुक्यांचा समावेश

महावितरणच्या सेलू विभागाचे लोकार्पण, पाच तालुक्यांचा समावेश

सेलूला राज्यातील पहिले सौर सिटी बनविणार : पालकमंत्री मेघना बोर्डीकर

सेलू जि.परभणी : नव्याने कार्यान्वीत झालेल्या महावितरणच्या सेलू विभागाचे लोकार्पण ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते गुरूवारी, १० एप्रिलरोजी करण्यात आले. सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनवणार असल्याचा निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला.

या वेळी महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, नांदेड परिमंडळाचे  मुख्य अभियंता राजाराम माने, अधीक्षक अभियंता रुपेश टेंभुर्णे, सेलूचे कार्यकारी अभियंता उमेश धोंगडे, अभियंता मंदार वग्यानी आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा मतदारसंघातील ५० हजारावर नागरिकांना लाभ मिळवून द्यायचा आहे, तर सेलू शहराला सोलार सिटी करण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन बोर्डीकर यांनी केले.

ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकिय सोयीकरिता परभणी विभाग क्रमांक एक व दोनची पुनर्रचना करून परभणी विभाग व नव्याने सेलू विभाग असे बदल करण्यात आले आहेत. विभाग क्रमांक दोनचे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरीत करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. सेलू येथे १३२ केव्ही मंजूर झाले होते. पण येथील अधिकाऱ्यांनी वीजेची मागणी कमी असल्याने १३२ केव्हीची आवश्यकता नसल्याचा चुकीचा अहवाल पाठवला होता. असा अहवाल पाठविणाऱ्यावर आता कारवाई होणार असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या. सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा मोठा व्यापार होतो. त्यासाठी सेलूत १३२ केव्हीची आवश्यकता आहे. हे काम आता तत्परतेने मार्गी लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीजपुरवठा संदर्भात, सेलू शहर व परिसरातील सामान्य नागरिकांची दखल घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, अन्यथा संबधितावर कडक कारवाईचा इशारा पालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना दिला आहे. दरम्यान, सेलू विभाग क्रमांक दोनमध्ये जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ तालुका तसेच पाथरी उपविभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर विभाग एकचे कार्यक्षेत्र आता परभणी शहर, परभणी ग्रामीण, पूर्णा, पालम, गंगाखेड उपविभागांत विस्तारित झाले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!