भगवान महावीरांच्या जयघोषाने सेलू दुमदुमले
पालखी मिरवणूक उत्साहात, ‘अंहिसा रथ’ ठरला लक्षवेधी,
सेलू जि.परभणी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची २६२३ वी जयंती गुरूवारी, १० एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा व भगवान महावीर प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांसह, महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल, ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
सेलू शहरातील दिंगबर जैन मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ‘अहिंसा रथ’ लक्षवेधी ठरला. दर्शनी भागात भगवान महावीरांनी सांगितलेली सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही जैन धर्माची पाच मुख्य तत्त्वे ठळकपणे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त मागील चार दिवसांपासून जैन मंदिरात भगवान महावीरांचा जलाभिषेकांसह, स्वाध्याय, ध्वजारोहण, अभिषेकपूजन, विविध धार्मिक विधी उत्सव, भजन संध्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. गुरुवारी परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंदिराला भेट देऊन सकल जैन समाज बांधवांना दिल्या. या वेळी बोर्डीकर यांचा बहुमान करण्यात आला. महाप्रसादाने सांगता झाली. उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.