महामानव डॉ.आंबेडकर यांना वाचन उपक्रमाद्वारे अभिवादन
सेलूतील विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम
सेलू : संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत महापुरुष, क्रांतिकारक यांची व्यक्तिमत्त्व व विचार पोहचावेत तसेच वाचन संस्कृतीची रुजवणूक व्हावी, या उदात्त हेतूने विवेकानंद विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुस्तक वाचन उपक्रम घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
‘वाचाल तर वाचाल’ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मौलिक संदेश आत्मसात करावा व पुस्तकांशी मैत्री करून ज्ञानाची समृद्धी व्हावी, यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती.इयत्ता ३ री, ४ थी व ६वी च्या विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रमात सहभाग नोंदविला. स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, शालेय समिती अध्यक्ष करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे, रागिणी जकाते, अनिल कौसडीकर, गजानन साळवे, विनोद मंडलिक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. मराठी विभाग प्रमुख विजय चौधरी, ग्रंथालय विभागप्रमुख काशिनाथ पांचाळ यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.