भारतीय सेनेसाठी सेलूतील बालाजी मंदिरात सामूहिक प्रार्थना
सेलू : पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडून “ऑपरेशन सिंदूर” राबवले जात आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी, लष्करी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तसेच राष्ट्रीय ऐक्य, देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व आणि देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सेनादलाच्या विजयासाठी येथील श्री बालाजी मंदिरात शुक्रवारी, ९ मे रोजी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील युवक- युवती, महिला, जेष्ठनागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सामुदायिक हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र पठण व प्रार्थना घेण्यात आली.
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक वीरजवानांना प्रार्थनेच्या माध्यमातून मनोधैर्य व आत्मबल वाढावे; तसेच सर्व नागरिकांनी शांतता, संयम बाळगावा, एकजुटीने राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये, धार्मिक सलोखा व सामंज्यस्याचे पालन करावे शासनाच्या आवाहनानुसार प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे, मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैन्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.