अपघातात चिमुकलीचा मृत्यू; आई व मामा गंभीर जखमी

अपघातात चिमुकलीचा मृत्यू; आई व मामा गंभीर जखमी

सेलू-वालूर रस्त्यावर राजवाडीपाटीजवळील घटना

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू ते वालूर रस्त्यावरील राजवाडी पाटीजवळ रविवारी, ११ मेरोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छोटा हत्ती व दुचाकी या दोन वाहनात जोराची धडक होवून अपघात झाला. या अपघातात एक पाच वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली, तर तिची आई व मामा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही वाहनासह छोटा हत्ती चालकास ताब्यात घेतले आहे.

वालूरच्या दिशेने दुचाकी येत असताना ऑटो हा वालूरकडे जात असताना राजवाडी पाटी परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबरी रस्त्यावर दोन वाहनात भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात दुचाकी (एमएच. ३८ टी.३३०४) व छोटा हत्ती (एमएच.४८ टी.५९९६) या दोन वाहनात धडक होवून अपघात घडला. दुचाकीवर आई, मुलगी व तिचा मामा असे तिघे जात होते. या अपघातात पाच वर्षीय ज्ञानाई सुरेश खरात (रा.इरळद ता. मानवत) हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जागीच ठार झाली. तर तिची आई दुर्गा सुरेश खरात (वय २१) व मामा माणिक वैजनाथ गोरख (रा.साळणा, जि. हिंगोली) हे दोघे जण जखमी झाले असून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी छोटा हत्ती चालक मिर्झा अब्दुल रहमान (वय २६, रा.वरुड, ता.जिंतूर) यास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा बळी ?

सेलू ते वालूर रस्त्यावर राजवाडी पुलाची उंची खूप कमी असल्यामुळे पूल आहे की नाही हे कळतच नाही. तसेच संरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीच उपाययोजना केल्या नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर गावाच्या ठिकाणी वाहनाचा वेग मर्यादा कमीबाबत उपाययोजना नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा उपाययोजना करण्यासंदर्भात अनेक वेळा कल्पना देऊन सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाहक अपघातात अनेकांचा बळी जात आहेत.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!