श्रीनृसिंह जन्मोत्सवनिमित्त भाविकांची गर्दी
दर्शनासाठी पोखर्णीत अलोट गर्दी, सेलूत विविध कार्यक्रम
परभणी : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे श्रीनृसिंह जन्मोत्सव सोहळा रविवारी, ११ मेरोजी सायंकाळी ६.४९ वाजता ‘ नरहरी शामराज की जय ‘ चा जयघोष, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्रातील एक जाज्वल्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी अनेक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. पंचक्रोशीतील भाविकांची रविवारी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होती. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन झाले. संस्थानच्या वतीने ४० हजार लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले, असे संस्थांनचे अध्यक्ष एम.आर.वाघ यांनी सांगितले. श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त मंदिरावर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्ताने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
सेलूत श्रीनृसिंह जन्मोत्सव सोहळा
सेलू येथील पांडे गल्ली मधील प्राचीन श्री नृसिंह मंदिरामध्ये रविवारी श्री नृसिंह जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भागवताचार्य नागनाथगुरू विडोळीकर यांचे श्री नृसिंह जन्मावर कीर्तन झाले. रात्री ९ वाजता पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी महाप्रसाद झाला. पुजारी अनंतराव पाटील, देविदास पाटील, केशव पाटील, नारायण पाटील, हेमंत दिग्रसकर आदींसह मान्यवर व भाविकांची मोठी उपस्थिती होती.