Jayant Narlikar : The Indian astrophysicist माझी स्वाक्षरी हवी असेल…

Jayant Narlikar : The Indian astrophysicist

माझी स्वाक्षरी हवी असेल…

डॉ.जयंत नारळीकर यांच्या आठवणींना सेलूकरांकडून उजाळा

Jayant Narlikar : The Indian astrophysicist माझी स्वाक्षरी हवी असेल...

सेलू (जि.परभणी) : उन्हाळ्याचे दिवस…वर्ष १९९३…वेळ सायंकाळची…नूतन विद्यालयाच्या परिसरात श्रोत्यांची गर्दी फुललेली…मावळतीचा उजेड संपून अंधारछाया पसरू लागली…व्याख्यानादरम्यान आपल्या सहाय्यकाला नम्र सूचना देत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ‌.जयंत नारळीकर म्हणाले, ” आणखी पुढची स्लाईड पाहू…” आणि श्रोते तल्लीन होऊन खगोलशास्त्रीय विश्वात डु़ंबून जायचे…डॉ.जयंत नारळीकर यांनी पुण्यातील राहत्या घरी मंगळवारी, २० मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळाली. आणि नूतन संस्थेतील शिक्षकांसह सेलूकरांनी डॉ.नारळीकर यांच्या आठवणी जागवल्या.

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे १२ वे पुष्प गुंफण्याच्या निमित्ताने दोन दिवस सायंकाळी डॉ.नारळीकर यांनी सेलूकरांशी हितगुज साधले. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले डॉ.नारळीकर यांचा साधेपणा सदैव प्रेरणादायी ठरणारा आहे. सेलू आणि संस्थेच्या परिसरात ते चांगले रमले. स्लाईडस्व्दारे अभ्यासपूर्ण, ज्ञानवर्धक आणि रंजक व्याख्यानात देत ” खगोलशास्त्रातून दिसणारे विश्व” त्यांनी उलगडून दाखविले, अशी आठवण व्याख्यानमालेचे विद्यमान संयोजक तथा कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी सांगितली. या व्याख्यानाला संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष बद्रीनारायणजी बिहाणी, सचिव बन्सीलालजी गिल्डा, ॲड.वसंतराव खारकर, शंकरराव मंडलिकगुरूजी, गोविंदराव देशमुखगुरूजी, प्राचार्य द.रा.कुलकर्णी, डी.के.देशपांडेगुरूजी, संयोजक प्रा.डॉ.बी.टी.भोसकर, प्रा.विनायकराव कोठेकर आदींसह परभणी जिल्ह्यातील आणि सेलू व आसपासच्या परिसरातील श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

अंधार पडू लागल्यावर डॉ.नारळीकर यांनी स्लाईडव्दारे प्रोजेक्टरच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय विश्वाचे दर्शन घडविले. ” आणखी पुढची स्लाईड पाहू…” एवढीच नम्र सूचना डॉ.नारळीकर सहायकाला देत, हे विशेष भावले, अशी आठवण शिक्षक अशोक लिंबेकर यांनी सांगितली. प्रा.भोसकर यांच्या पुढाकाराने “आकाशातील तारांगण” हा उपक्रमही डॉ.नारळीकर यांच्या उपस्थितीत नूतन महाविद्यालयाच्या छतावर झाल्याची आठवण कवी गौतम सूर्यवंशी यांनी दिली. संस्थेच्या वतीने आयोजित डॉ.नारळीकर यांचे व्याख्यान आणि सहवास अविस्मरणीय आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर संस्थेच्या परिसरातील त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, असे संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर म्हणाले.

” खगोलशास्त्रातून दिसणारे विश्व” या विषयावरील दोन दिवसीय व्याख्यानातून डॉ.नारळीकर यांनी अवघडसा वाटणार विषय अत्यंत सोपा पद्धतीने समजावून सांगितला. हे सेलूकरांच्या कायम स्मरणात आहेच. पण समारोप्रसंगी डॉ.नारळीकर यांनी श्रोत्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून साधलेला मनमोकळा संवाददेखील तितकाच अविस्मरणीय आहे. श्रोत्यांमध्ये काही शालेय विद्यार्थीही होती. कुतूहलापोटी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या जंत्रीला उत्तरे देत डॉ.नारळीकर यांनी शंकांचे निरसन केले. ” माझ्याकडे पुष्कळ प्रश्न आलेत. आणि तुम्हाला माहित आहे, कुठल्याही प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न सोडवा असं नसतं ” अशी सुरूवात डॉ.नारळीकर यांनी करताच वातावरण पुन्हा फुलून गेले. एकेक करून अनेक प्रश्नांना उदाहरण व दाखल्यांसह स्पष्ट करीत डॉ.नारळीकर यांनी व्याख्यानाची जणू पुन्हा उजळणीच घेतली. व्याख्यानमालेच्या सुर्वण महोत्सवानिमित्ताने नूतन संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या ग्रंथातील डॉ.नारळीकर यांच्या व्याख्यानातील दिलखुलास प्रश्नसंवादाचा काही भाग असा :

प्रश्न : दहावा ग्रह सापडला आहे का ?
डॉ.नारळीकर : दहावा ग्रह सापडलेला नाही.
प्रश्न : शनिचे कडे कशामुळे तयार झाले ?
डॉ.नारळीकर : केवळ शनिला नसून अन्य ग्रहांनाही कडे आहेत. कडी म्हणजे ग्रहाभोवती फिरणारे धुलीकण असतात.
प्रश्न : मेघ कसा तयार होतो ?
डॉ.नारळीकर : आकाशगंगा तयार होतानाच मेघ तयार होतो. आकाशगंगा वायूची बनलेली असते वायू आणि धुली कणांचे पुंजके म्हणजे मेघ असतात.
प्रश्न : सूर्यावर काळे डाग का दिसतात ?
डॉ.नारळीकर : सूर्यावरील काळे डाग म्हणजे आजूबाजूच्या तापमानापेक्षा कमी तापमान असलेला भाग.
प्रश्न : आकाशाचा रंग निळा का आहे ?
डॉ.नारळीकर : सूर्याचा प्रकाश वायुमंडळाच्या धुलीकणातून इकडे तिकडे पसरला आहे. त्याला ‘स्कॅटरिंग’ म्हणतात. या प्रकारात निळा रंग पसरला जातो. लाल रंग पसरत नाही. म्हणून आकाश जास्त निळसर दिसते.

आणि शेवटी डॉ.नारळीकर म्हणाले, ” इतक्या लांबून येऊन भाषण दिलं असे आपण म्हणालात. परंतु त्याचं समाधान याच्यात असतं की श्रोते लोक दाद देतात. प्रश्न म्हणजे ही एक दाद आहे, असे मी समजतो. सर्वच प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकलो नाही. प्रश्नं चांगली आहेत. आणखी उत्तरे देता आली असती तर बरं झालं असतं. ज्यांना माझी स्वाक्षरी हवी असेल, त्यांनी एखाद्या पोस्टकार्डवर स्वतःचा पत्ता लिहून ‘आयुका, पुणे सात’ या पत्त्यावर अशा तऱ्हेचे प्रश्न पाठवावीत. मी त्यांना उत्तर देईन.” पण असे उत्तर आता येणार नाही…

– बाबासाहेब हेलसकर ( शिक्षक, नूतन विद्यालय, सेलू, 9881525510)


फोटो : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी बत्तीस वर्षापूर्वी सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे १२ वे पुष्प गुंफले होते. सोबत प्राचार्य द.रा.कुलकर्णी.


 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!