पहिलीपासून हिंदीला स्थगितीच
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती
पुणे : इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. हिंदीच्या सक्तीबाबत राज्यातील अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षकांकडून सूचना आल्या आहेत. या सूचनांचा विचार करून, सुधारित निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली.
दादा भुसे यांनी पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट दिल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे,सागर वैद्य आदी उपस्थित होते. ‘बालभारती’ ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीबाबत संभ्रम निर्माण झाल्याची विचारणा भुसे यांना करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, की ‘पहिलीपासून हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, याबाबत कोणतेही दुमत असू नये. काही शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसरीपासून हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, तर काहींनी निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या आहेत. या सर्व सूचनांचा विचार करून, शिक्षण विभागाकडून याबाबतचा सुधारित निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार आहे.’