महाराष्ट्रात मान्सून दाखल
गोवा, तळकोकणासह मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही पाऊस
पुणे : केरळ, कर्नाटकमध्ये दाखल झाल्यापासून दुसऱ्याच दिवशी मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापून रविवारी तळ कोकणात प्रवेश केला. दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मराठवाड्याकडे सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान अनुकूल असल्याने पुढील तीन दिवसांत मान्सून मुंबईसह राज्याचा आणखी काही व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
यंदा सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस आधी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने १३ दिवस आधीच (सर्वसाधारण तारीख सात जून) महाराष्ट्रात प्रवेश केला. शनिवारी कर्नाटक किनारपट्टीच्या उत्तर भागातील कारवार येथे पोचलेल्या मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा ओलांडत तळ कोकणातील देवगडपर्यंत मजल मारली. मान्सून प्रगतीची उत्तर सीमा रविवारी देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझॉल, कोहिमा येथून जात असल्याचे ‘आयएमडी’ ने स्पष्ट केले. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी मोसमी वाऱ्यांचा प्रवाह तीव्र असल्याने पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मान्सून वेगाने प्रगती करीत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून, या काळात महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये मान्सूनच्या प्रगतीची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी रत्नागिरीजवळ किनारपट्टी ओलांडलेल्या ‘डिप्रेशन’ची तीव्रता रविवारी पूर्वेकडे सरकताना कमी झाली. रविवारी ठळक कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावर स्थिरावले. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी सर्वदूर संततधार पावसासह मुसळधार सरींनी हजेरी लावली.