सेलूच्या १३२ के.व्ही.वीज उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमीपूजन

सेलूच्या १३२ के.व्ही.वीज उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमीपूजन

परभणी  : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे ई-भुमिपुजन तसेच सेलूच्या १३२/३३ के.व्ही.वीज उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमीपूजन झाले.

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांच्यासह कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषि आयुक्त सुरज मांढरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंन्द्र मणि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. किशोर शिंदे उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रस्तावित नविन इमारतीचे ई-भूमिपुजन करण्यात आले.महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सुरु करण्यात आले आहे. या संस्थेकरिता शासनाकडुन गंगाखेड रोड वरील ब्राम्हणगाव व ब्रम्हपुरी या गावाच्या शिवारात एकुण २०.०० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेवर ४३० खाटांचे रुग्णालय व १०० विद्यार्थी क्षमतेचे एम.बी.बी.एस महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच हे महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणारे हॉस्टेल, डॉक्टरांना राहण्यासाठी निवासस्थान, गेस्टहाऊस या सुविधा या जागेत बांधण्यात येणार आहे. बांधकामासाठी ४०३.९८ कोटी रुपये राज्य शासनाने मंजुर केले आहेत.

सेलू उपकेंद्राचे ई-भूमीपूजन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते १३२/३३ के.व्ही. सेलु उपकेंद्राचे ई-भूमीपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे सेलु तालुक्यातील जिनिंग, प्रेसिंग, हातमाग उद्योग व सेलु औद्योगिक क्षेत्रातील अस्तित्वात असलेले तसेच भविष्यात येणाऱ्या उद्योगांसाठी योग्य दाबाने व अखंडित वीज पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. या बरोबरच सेलु तालुक्यातील शेतकरी व वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!