वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावे

वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावे

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

परभणी : सध्या कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दररोज लक्षणीय वाढ होत आहे. कुठल्याही प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या आरोग्यास कोरोना संसर्गाचा धोका होणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन, तसेच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि पाऊस याचा विचार करून प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अध्यक्ष डॉ.संजय धाबर्डे यांनी २९ मे रोजी परिषदेच्या संचालकांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परिषदेच्या वतीने २ जून ते १२ जून दरम्यान वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजित ठरलेले आहे. परंतु, सध्या राज्यात आणि देशात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दररोज लक्षणीय वाढ होत आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्रावर जिल्ह्यातून विविध ठिकाणावरून प्रशिक्षणार्थी शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका प्रशिक्षणार्थी शिक्षकांना होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या आरोग्यास कोरोना संसर्गाचा धोका होणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन, नियोजित प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे.

तसेच यावर्षी प्रथमतः इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण राज्यात ऑनलाईन‌ पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेता येणार नाही, कारण बरेच कनिष्ठ महाविद्यालय हे वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षकेत्तर कर्मचारी देय नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण कामकाज हे शिक्षकांना करावे लागते. तसेच सद्य परिस्थित संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत केले आहे, अशीच पावसाची परिस्थिती प्रशिक्षणादरम्यान असल्यास बऱ्याच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जिल्हा मुख्यालयातील प्रशिक्षण स्थळी पोहचणे सुद्धा शक्य होणार नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षक याचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही. या बाबीचा सकारात्मक विचार करून आणि कोणत्याही प्रशिक्षणार्थी शिक्षक यांना कोरोना संसर्ग होणार नाही. त्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. याकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!