वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षणाचा कालावधी बदलणार ?
शिक्षक आमदार किशोर दराडे, विक्रम काळे यांची प्रशिक्षण कालावधी बदलण्याची मागणी, संघटनांचाही रेटा सुरूच
१६ जूननंतर प्रशिक्षण घ्यावे – वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या २ जून ते १२ जून या कालावधीत अनेक शिक्षकांच्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे हे प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यावर १६ जूननंतर घ्यावे, याबाबतचे निवेदन सादर करणार आहे. यासंदर्भात परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याशी व्यक्तिशः बोलणार आहे. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशीही याबाबत चर्चा केली जाईल. – विक्रम काळे, शिक्षक आमदार, छत्रपती संभाजीनगर विभाग
कालावधीत बदल करावा – विद्यापीठाच्या वर्षे २०२५ च्या परीक्षा २ जून २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत. याच कलावधीत सर्व शिक्षक संवर्गाचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणाचे राज्य स्तरावरून आयोजन केलेले आहे. परीक्षा आणि प्रशिक्षण दोन्ही एकाच कालावधीत असल्यामुळे प्रशिक्षणासोबतच परीक्षेला देखील उपस्थीत राहणे आवश्यक असल्यामुळे शिक्षकांनी कशाला प्राधान्य द्यावे, याबद्दल संभ्रम आहेत. त्यामुळे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाच्या कालावधीत बदल करावा जेणेकरून तच्च शिक्षण घेण्याच्या हेतूने परीक्षेला बसलेल्या पात्र शिक्षकांना हे प्रशिक्षणही पूर्ण करता येईल व मुक्त विद्यापीठाची परीक्षाही देता येईल.-किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग
परभणी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्यस्तरावर एकाच टप्प्यात दोन जून ते १२ जून या कालावधी ऑफलाईन आयोजित करण्यात आलेले आहे. मात्र, प्रशिक्षण कालावधीतच अनेक शिक्षकांच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विचारात घेता, प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक संघटनांनी लावून धरली आहे. तर करोना रुग्णांची वाढती संख्या, पाऊस आदींवरून ऑनलाईन प्रशिक्षणाची मागणीही विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे प्रशिक्षणावरून असलेला संभ्रम दूर व्हावा, अशी अपेक्षा राज्यभरातील शिक्षकवर्गातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संघटनापाठोपाठ आता नाशिकचे शिक्षक आमदार किशोर दराडे आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनीही मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांमुळे प्रशिक्षण कालावधीत बदल करण्याची मागणी केली आहे.
२९ मेरोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही शिक्षकांना परीक्षा व प्रशिक्षणही करता यावे यासाठी प्रशिक्षण कालावधीत बदल करण्याची मागणी संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष तानाजी कांबळे व सचिव संजय केवटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिक्षक सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, मराठवाडा शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद आदींनी निवेदन देऊन प्रशिक्षण पुढे ढकलण्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशिक्षण तसेच परीक्षांपासून शिक्षक वंचित राहू नयेत, याचा विचार करणे क्रमप्राप्त झाले आहे.
प्रशिक्षण ऑनलाईन घ्यावे
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज लक्षणीय वाढ होत आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या आरोग्यास संसर्गाचा धोका होणार नाही याची गांभीर्याने दखल घेऊन, तसेच इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि पाऊस याचा विचार करून प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अध्यक्ष डॉ.संजय धाबर्डे यांनी २९ मे रोजी परिषदेच्या संचालकांकडे निवेदन पाठवून केली आहे.
प्रशिक्षणाची तयारी पूर्ण – दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्यस्तरावर एकाच टप्प्यात दोन जून ते १२ जून या कालावधी ऑफलाईन आयोजित करण्यात आलेले आहे. परिषदेच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रशिक्षणाची जय्यत तयारी पूर्ण होत आली आहे. प्रशिक्षण स्थळे निश्चित करून प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या जिल्हानिहाय याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुलभकांचे प्रशिक्षणही अंतिम टप्प्यात आहे. राज्यभरातील सुमारे ४० हजारावर शिक्षकांनी नोंदणी केलेली असून प्रशिक्षण सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत दिले जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.