संत गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाड्यात गुरुवारी आगमन
पानकनेरगांवात स्वागत, सेनगांवात मुक्काम
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : श्रीक्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जून गुरुवाररोजी मराठवाड्यात आगमन होणार आहे. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर पानकनेरगांव येथे दुपारी पालखीचे स्वागत केले जाणार आहे. सेनगांव येथे सांयकाळी मुक्काम आहे. सेनगांवकरांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील ५५ वर्षापासून श्रीक्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराजांचा हजारो वारकऱ्यांचा सहभाग असलेला पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्त आयोजित केला जातो. यावर्षी २ जून सोमवाररोजी श्रीक्षेत्र शेगांव येथून भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. अकोला, पातुर, श्रीक्षेत्र डव्हा, शिरपुर जैन, मसला, रिसोड मार्गे पालखी सोहळ्याचे १२ जून गुरुवाररोजी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर पानकनेरगांव येथे दुपारी आगमन होऊन जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. सेनगांव येथे मुक्काम राहणार असून भाविक भक्तांना सेनगांवकरांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. १३ जून शुक्रवाररोजी सकाळी ४ वाजता श्रींची आरती झाल्यानंतर पालखी सोहळा श्रीक्षेत्र नर्सी (नामदेव) कडे प्रस्थान होणार आहे. संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात ७०० वारकरी सहभागी असणार आहेत. यामध्ये अश्व, भगवे पताकाधारी तसेच श्री क्षेत्र संस्थानचे तज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टिम व फिरते दवाखाने उपलब्ध असतील. सेनगांव तालुक्यात ठिकठिकाणी या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करुन वारकऱ्यांच्या नाश्ता, चहा, पाणी व भोजनाची व्यवस्था केली जाते.