राहुल रेखावार यांची हकालपट्टी करा : शिक्षकसेना
रत्नागिरी येथील घटनेवरून शिक्षक सेना आक्रमक, परभणीत जोरदार निदर्शने, रेखावार यांचा जाहीर निषेध
परभणी : दोन जूनपासून राज्यभर सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात शिक्षकांवरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षकसेना आक्रमक झाली आहे. रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या शिक्षकांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, असंवेदनशील धोरण व शिक्षकांच्या अवहेलनेचा परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने सोमवारी, ९ जून रोजी निदर्शने करीत जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत, रेखावार यांची तत्काळ हकालपट्टी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ परिसरातील प्रशिक्षण केंद्रावर शिक्षक सेना पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी रत्नागिरी येथे जाणार्या शिक्षकांच्या वाहनाला झालेला अपघात केवळ प्रशिक्षणस्थळी वेळेवर पोहोचण्याच्या घाईमुळे झाला. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रमुख अधिकारी राहुल रेखावार यांचे कडक, अमानवी धोरण कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
फक्त काही मिनिटे उशीर झाल्याने अनेक शिक्षकांना प्रशिक्षण केंद्रावरून परत पाठवले गेले, तर काही शिक्षकांनी वेळेवर पोहोचूनही गर्दीमुळे सही करू न शकल्याने त्यांनाही प्रशिक्षणास मुकावे लागले. एका शिक्षकाची प्रशिक्षणादरम्यान प्रकृती बिघडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षकांवर लष्करी शिस्त लादल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकसेनेचे राज्याध्यक्ष तथा आमदार ज.मो.अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिगंबर मोरे गुलाब हरकळ, महानगराध्यक्ष प्रकाश हरगावकर, तालुकाध्यक्ष जय शंकर राखुंडे, गिरीश पिंपळगावकर, बाळासाहेब मोरे, नरेंद्र दिशागत , पंडित नाईक, लक्ष्मण वाघमारे, शेख आली, सरचिटणीस पंडित दराडे, विष्णू सूर्यवंशी, मुंजाराम मुंडे, स.बी. पामे, के.एच. रेंगे, एस.एस. जाधव, झांबरे, एस.बी. नाईक, पी.आर. दासरवाड, डी.एल. ताठे,जी.बी. जोशी, एम.बी. धनाटे, डी.व्ही. केजगिर, एम.टी. बिडगर, जानू अ. रहेमान, अत्तार अ. वाहिद, ए.ए. सिद्दीकी, ए.जी. वडकर, व्ही.डी. सूर्यवंशी, व्ही.डी. कदम, बी.एस. काळे, एस.एस. भारती, आर.व्ही. सिताफळे, एस.के. जाधव, व्ही.एस. मोपकर, एन.बी. दिशागत, एल.बी. वाघमारे, एस.एस. गोरे, एस.व्ही. सदगे, एम.एन. शेळके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात शिक्षकांवर लष्करी शिस्ती लादून अविश्वास दाखविला जात आहे. रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या शिक्षकांच्या अपघातास संचालक राहुल रेखावार यांचे अमानवी धोरण कारणीभूत आहे, असा आमचा आरोप आहे. शिक्षकांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.- बाळासाहेब राखे, कार्याध्यक्ष, मराठवाडा विभागीय शिक्षक सेना, परभणी