श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीचे जल्लोषात स्वागत
पानकनेरगावमध्ये जेसीबीच्या साह्याने पालखीवर फुलांचा वर्षाव
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पंढरीच्या दिशेने निघालेली पालखी गुरुवारी, १२ जून रोजी मराठवाड्यात दाखल झाली आहे. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसराच्या स्वरात आणि ‘गण गण गणांत बोते’ च्या गजरात विदर्भ मराठवाडा सीमेवरील पानकनेरगावात पालखीवर जेसीबीच्या साह्याने साह्याने फुलांचा वर्षाव करीत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
संत गजानन महाराज पालखीचे ५६ वे वर्ष आहे. वारकऱ्यांनी पांढरे वस्त्र परिधान करून हाती भगवे पताके घेत शिस्तबद्ध दिंडीची परंपरा आजही जपली आहे. ‘श्री’चा पालखीमध्ये पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह ७०० वारकरी सहभागी असून सुमारे ७२५ किमीचा रस्ता विठ्ठलाच्या जयघोषामध्ये महिनाभरात पूर्ण करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे पाटील परिवाराच्या वतीने शिवाजी मुटकुळे यांनी व तसेच मराठवाड्यातील भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे फटाक्याच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले.
पानकनेरगावातील मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. बँड पथकाच्या मंगल स्वरात जेसीबीच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला. दुपारचे स्नेहभोजन व विश्रांती घेतल्यानंतर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. भक्तांनी जागोजागी अल्पोहार, चहापाणी, पानाचा विडा, बिस्कीटचे पूडे, तसेच आवश्यक वस्तू यावेळी वारकऱ्यांना दिल्या जातात. काही ठिकाणी तर वारकऱ्यांचे पाय धुवून स्वागत सुद्धा केले जाते. पालखीमध्ये हत्ती घोडे व तसेच श्री संत गजानन महाराजांची मूर्ती रथावर पाहावयास मिळाली. पानकनेरगाव येथून विश्रांती घेतल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास महाराजांची पालखी सेनगावकडे प्रस्थान झाली आहे. १२ जून रोजी सेनगाव येथे मुक्कामी राहणार असून आहे. तेथून श्रीक्षेत्र नर्सी (नामदेव) कडे प्रस्थान होणार आहे. सेनगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता