सेवानिवृत्तांच्या योगशिबिराला सेलूत प्रतिसाद
आरोग्यासाठी योगसाधनेत सातत्य हवे : योगतज्ज्ञ शरद कुलकर्णी
सेलू : निरामय स्वास्थ्य व दीर्घायुरारोग्य्यासाठी योगसाधनेत सातत्य आणि योगासन क्रियेबरोबर चित्तशुद्धी आवश्यक आहे. असे प्रतिपादन संभाजीनगर येथील योगतज्ज्ञ शरद कुलकर्णी यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोमवार ( दि. १६ ) रोजी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी होते. तर व्यासपीठावर टी. के. कुलकर्णी , नारायण इक्कर, सुनंदा खेडकर यांची उपस्थिती होती. पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने महिला व पुरुष योगसाधकांसाठी यशवंतनगर मधील सभागृहात दि १४ ते २० जून कालावधीसाठी सकाळी योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘ शरिर, मन व चित्तशुद्धीसह अष्टांग योगाचे सातत्यपूर्ण अनुसरण केले पाहिजे.” शिबिरातील साधकांना त्यांनी योगाचे महत्व पटवून दिले. योग शिबिरात पन्नास योगसाधकांनी सहभाग घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी यांनी योगसाधना ही ध्वनीफितीच्या सहाय्याने एकाकीपणे करण्यापेक्षा सामुहिक सहभागातील आनंददायी साधनेने केली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण इक्कर यांनी केले . तर सुनंदा खेडकर यांनी आभार मानले. शिबीर यशस्वीतेसाठी असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.