मुरूंबाची झेडपी शाळा सुसज्ज करणार
अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची ग्वाही
परभणी : मुरूंबा (ता.परभणी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बोलताना शाळेचे दत्तक पालक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हे त्यांच्या भावी आयुष्याच्या प्रगतीची नांदी ठरते. यादृष्टीने शाळा आवश्यक त्या सर्व शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधांनी अधिक सुसज्ज करण्यात येईल.
इयत्ता पहिली वर्गात प्रवेशित नवागत विद्यार्थ्यांचे व पालकांचे मंगळवारी आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात डॉ.काळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.गणेश शिंदे, केंद्रप्रमुख माणिक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ.काळे यांनी शाळा विकास संबंधित सर्व मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले; तसेच समस्या जाणून घेत, त्या त्वरित दूर करण्याची व्यवस्था केली. ज्या भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्या त्वरित पूर्ण करण्याची ग्वाही दिली. ‘विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल’ या सेल्फी पॉईंट संकल्पनेचे आणि शिक्षकांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. प्रा.शिंदे यांनी मराठी शाळेचे महत्त्व विषद केले.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी शाळा दत्तक घेतल्यापासून शाळेमध्ये विविध भौतिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. समस्या तत्काळ दूर होत आहेत, असे केंद्रप्रमुख जाधव यांनी नमूद करून आभार व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक दत्ता गायकवाड व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच, उपसरपंच, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, महिला पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमासाठी शिक्षक चंद्रकांत कदम, मदन कदम, श्री.पुरी, मीनाक्षी उदास, श्रीमती पोटेकर, मनीषा पिंगळकर, सुनिता बेकटे आणि सविता कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.