गोविंदराम दादूपंथी मठ जमीन; दोन्ही संचालकांचे फेरफार रद्द

गोविंदराम दादूपंथी मठ जमीन; दोन्ही संचालकांचे फेरफार रद्द

सेलू : येथील सर्व्हे क्रमांक १५७, १५८ आणि १६२ मधील पदमसी जिनिंग ॲन्ड प्रेसिंगला ९९ वर्षांच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमिनीची मूळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपविभागीय महसूल अधिकारी संगीता सानप यांनी दिला आहे. या निर्णयामुळे इतर दोन संचालकांनी स्वतःच्या नावावर केलेले फेरफार रद्द झाले आहेत.

गोविंद राम दादुपंथी मठ संस्थानने पदमसी जिनिंग ॲन्ड पेसिंग कंपनीला (सर्व्हे क्रमांक १५७, १५८१६२) नियम व अटींच्या अधीन राहून ९९ वर्षांसाठी आपली जमीन दिली होती. मात्र, संबंधित जिनिंग सन २००० साली बंद झाल्यामुळे कंपनीबरोबर केलेला करार संपुष्टात आला. कराराचा कालावधी संपल्यानंतरही पदमसीचे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी दिनांक ०७२८ ऑगस्ट २०२४ रोजी अनुक्रमे फेरफार क्रमांक १५२१५१५२३२ अंतर्गत जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती.

उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती संगीता सानप यांनी वरील दोन्ही फेरफार रद्द केल्याने संबंधित जमिनीची मूळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच असल्याचे निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे.

पदमसी जिनिंगचे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी मठ संस्थानची जमीन तहसीलदार सेलू यांच्याकडे आरओआर याचिकेद्वारे फेरफार करून आपल्या नावावर केली होती. या फेरफारीच्या विरोधात मठ संस्थानचे सचिव राजेंद्र करवा व कपिल पडूळ यांनी ॲड. शिवाजी जाधव व ॲड. लहेरचंद खोना यांच्यामार्फत १३ डिसेंबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी सेलू यांच्याकडे याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान अपीलार्थीच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, नियम व अटीप्रमाणे करारनाम्याचा कालावधी संपल्यामुळे संबंधित करार/लिज संपुष्टात आली असून, केलेला फेरफार बेकायदेशीर आहे. तर, ॲड. श्रीकांत वाईकर यांनी संचालकांच्या वतीने नोंदणी कायदेशीर असून करार वैध असल्याबाबतचा युक्तिवाद केला.

उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून १६ जून २०२५ रोजी निकाल दिला. त्यांनी नमूद केले की, तहसीलदारांनी कोणतेही अभिलेख तपासले नाहीत आणि या न्यायासनास मालकी ठरवण्याचा अधिकार नाही, त्यामुळे दोन्ही फेरफार रद्द करण्यात आले आहेत. तसेच, अपीलार्थी व उत्तरार्थी यांना सक्षम न्यायालयात दाद मागता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण निकालामुळे संबंधित जमिनीची मूळ मालकी गोविंद रामजी दादुपंथी मठाचीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!