अनाधिकृत फ्लेक्सवर कारवाईचा इशारा
जिंतूरच्या मुख्याधिकाऱ्यांची ताकीद : सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत टाले आणि सुरेखा शेवाळे टाले यांचे निवेदन
जिंतूर : जिंतूर शहरात अनाधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमबाह्य फ्लेक्स लावणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांची दुकाने बंद करण्याचा इशारा मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे. बुधवारी, २५ जूनरोजी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत टाले आणि सुरेखा शेवाळे टाले यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या भेटीत शहरातील दूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अनधिकृत फ्लेक्स बॅनर, अतिक्रमण आणि दिव्यांग कल्याणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मुख्याधिकारी दंडवते यांनी स्पष्ट केले की, पिण्याचे पाणी सुरक्षित आहे; रंगात बदल झाला असला तरी ते आरोग्यासाठी हानिकारक नाही. पाण्याच्या टाक्यांची पाहणी करून लवकरच सुधारणा केली जाईल. तसेच, भाजी मंडई आणि मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन सुरू आहे. पदपथावरील व्यापाऱ्यांसाठी दुसरीकडे व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विनापरवाना जाहिरातींना कठोर इशारा
शहरातील विनापरवाना फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग्जबाबत मुख्याधिकारी दंडवते यांनी सक्त ताकीद दिली आहे. ते म्हणाले, “नियमबाह्य फ्लेक्स लावल्यास संबंधित व्यावसायिकांचे दुकान सील करण्यात येईल. परवानगीशिवाय जाहिराती लावणे बेकायदेशीर आहे.”
दिव्यांग आणि युवकांसाठी योजनांची अंमलबजावणी
या चर्चेदरम्यान, दिव्यांग नागरिकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच, तरुणांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरणा देण्याचे उपक्रम हाती घेण्याचा संकल्पही करण्यात आला. या चर्चेत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सुरेखा शेवाळे, मुन्ना टाले, गुलाब साबळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.