रेल्वे सुरक्षा बल चौकीचे सेलूत उद्घाटन
सेलू जि.परभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत सेलू स्थानकावर सर्वसोयीसुविधांनीयुक्त रेल्वे सुरक्षा बल बाह्य चौकीचे उद्घाटन २३ जून रोजी झाले आहे. रेल्वे महाप्रबंधक अरुण कुमार जैन आणि मंडळ रेल्वे प्रबंधक प्रदीप कामले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या वेळी परभणी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक परमबीर सिंग, सेलू बलाचे उपनिरीक्षक राजकुमार मीना व रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सेलू येथील रेल्वे सुरक्षा बल चौकीमध्ये पुरुष बंदी गृह, महिला बंदी गृह, व्यायाम शाळा, स्वयंपाक गृह, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र विश्राम कक्ष, रेकॉर्ड, लेखनिक कक्ष, मालखाना केस प्रापर्टी, उपनिरीक्षक, सीसीटीव्ही कक्ष आदी सुविधा असल्याची माहिती राजकुमार मीना यांनी दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण सहा मनुष्यबळ असणार आहे. यापैकी सध्या उपनिरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल, दोन कॉन्स्टेबल कार्यरत असून एक जागा रिक्त आहे. चौकीचे कार्यक्षेत्र सेलू ते मानवत स्थानकापर्यंत आहे.
रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वे संपत्तीची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखणे यासह रेल्वे प्रवाशांसाठी जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जातात. लवकरच सेलू स्थानकाचा संपूर्ण परिसर रेल्वे सुरक्षा बलाच्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली येणार आहे. प्रवाशांनी रेल्वेमध्ये चढताना, उतरताना तसेच प्रवासादरम्यान काळजी घ्यावी. काही अनुचित घटना, प्रकार होत असल्यास प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलास कळवावे, असे आवाहन मीना यांनी केले आहे.