आषाढी एकादशी : उत्कर्ष विद्यालयात वृक्षदिंडीचे उत्सव उत्साहात
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय आणि ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठूनामाचा गजर करत वृक्षदिंडीचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विठोबाच्या पालखी पूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे आणि डॉ.सविता रोडगे यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. महादेव साबळे, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास ताठे आणि ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ कांबळे तसेच श्री. उद्धव येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठोबा-रखुमाईच्या वेशभूषा हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात अधिक रंगत आणली. “माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषाही साकारल्या होत्या.
यावेळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात तुकाराम महाराजांच्या अभंगातून दैनंदिन जीवनातील वृक्षांचे स्थान, महत्त्व आणि उपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. महाराष्ट्राची भक्ती परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्वही या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. शिक्षकांनी या दिंडी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.