पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

नदी, नाल्यांना पूर, ठिकठिकाणी वाहतूक ठप्प

परभणी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम वगळता विविध भागात सोमवारी, २१ जुलै रात्री जोरदार पाऊस झाला. पाथरी तालुक्यात तब्बल ११७.८ मिलीमीटर, त्यापाठोपाठ सोनपेठ तालुक्यात ७३.४ मिलिमीटर पाऊस झाला. परभणीसह सेलू, मानवत, जिंतूरमध्ये रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी परभणी ४३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाथरी तालुक्यातील कासापुरी महसूल मंडळातील गावात सात तासांत ढगफुटी सदृश्य २१५ मिलीमीटर पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसामुळे दुधना, कसुरा, करपरा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाथरी-सेलू मार्गासह कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने छोट्या मोठ्या ओढ्याच्या मार्गावरील वाहतूक सकाळी ठप्प झाली होती. विविध महसूल मंडळात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पाथरी व सोनपेठ तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.‌ पाथरी ते सेलू मार्गावर कसुरा नदीला पूर आल्याने दुपारी चार वाजताही वाहतूक सुरळीत झाली नव्हती. वालूर, डासाळा, सातोना वाहतुकही बंद होती. जिंतूर, परभणी मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय झालेला सरासरी पाऊस मिलिमीटरमध्ये : परभणी ३१.२, गंगाखेड १३.८, पाथरी ११७.८ जिंतूर ४७.६, पूर्णा २८.९, पालम ७.९, सेलू ५३.६, सोनपेठ ७३.४ मानवत ४९.६

पाथरी, सोनपेठमध्ये अतिवृष्टी; कासापुरीत ढगफुटी

कासापुरीत ढगफुटी; २१५ मिमी पाऊस

पाथरी तालुक्यातील बाभळगाव (९८ मिलिमीटर), हदगाव (१११ मिलिमीटर), कासापुरी (२१५ मिलिमीटर), जिंतूर तालुक्यातील बोरी १०६ मिलीमीटर, वाघी धानोरा ६८.५०, सेलू तालुक्यातील चिकलठाणा ८७.७५, मोरेगाव ७९.२५, तर सोनपेठ १३६ आणि केकरजवळा ( ता.मानवत) ९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश्य पावसामुळे कासापुरी, जवळाझुटा, नाथरा, पाथरगव्हाण बुद्रुक, पाथरगव्हाण खुर्द यासह अन्य गावातील शेतजमीनीला तळ्याचे स्वरूप आले आहे. जवळाझुटा शिवारातून वाहणाऱ्या महानंदा नदीसह, ओढ्यांना पूर आल्याने पाणी शेतजमीनीत घुसले. जमीन खरडून गेल्या आहेत.

कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर बहुतांश भागात पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे सोयीबीन, कापूस, मूग उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
– राजेंद्र जवळेकर, शेतकरी, जवळाझुटा ( ता.पाथरी)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!