श्री गणेशोत्सव २०२५ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा
रुपये ५ लाखांचे प्रथम पारितोषिक, सहभागी होण्याचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांचे आवाहन
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असलेल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.
२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्या सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळांना भेट देऊन जिल्हास्तरीय परीक्षण करतील. राज्यस्तरीय परीक्षणात विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे या प्रत्येक जिल्ह्यांतून ३ शिफारसी, तर इतर ३२ जिल्ह्यांतून प्रत्येकी १ शिफारस अशा एकूण ४४ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी निवडल्या जातील. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क असून, गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्यांना प्रोत्साहन देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी, संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा करा अर्ज
♦ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील.
♦अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२५ आहे.
♦अपूर्ण अर्ज रद्द केले जातील.
असे होईल मूल्यांकन
♦ सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन
♦संस्कृतीचे जतन व संवर्धन
♦गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांच्या जतन व संवर्धनासाठी जनजागृती
♦विविध सामाजिक उपक्रम व कार्ये
♦ पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट
♦ ध्वनिप्रदूषणविरहित वातावरण
♦गणेशभक्तांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा
पारितोषिके आणि प्रमाणपत्रे
♦प्रथम पारितोषिक : रुपये ५ लाख आणि प्रमाणपत्र
♦द्वितीय पारितोषिक: रुपये २.५ लाख आणि प्रमाणपत्र
♦तृतीय पारितोषिक: रुपये १ लाख आणि प्रमाणपत्र
♦ जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना प्रत्येकी रुपये २५ हजार आणि प्रमाणपत्र