नशिल्या ‘बटण’ विक्रीचे सेलू कनेक्शन

औरंगाबाद : राहत्या घरातून नशेच्या गोळ्यांची (बटण) अवैध विक्री करणाऱ्या दिनेश साहेबराव हावळे (वय ५८, रा.एपीआय कार्नर, भवानीनगर ) याच्या पोलिस कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर.जगदाळे यांनी सोमवारी दिले. दरम्यान, या तपासाच्या निमित्ताने नशिल्या गोळ्या (बटण) अवैध विक्रीत कनेक्शन उघड झाल्याने, परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात खळबळ उडाली आहे.
हावळे हा लातूर, परभणी, नगर आणि पुण्यासह परळी येथील मेडिकल दुकानातून नशेच्या गोळ्या विकत घेत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) पथकाने नऊ जूनला त्याला ताब्यात घेतले होते. प्रकरणात ‘एनडीपीएस’ चे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी फिर्याद दिली आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आरोपी राम काळे आणि दिनेश हावळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. काळेची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपासादरम्यान हावळे हा सेलू (परभणी) येथील शरयू हॉस्पिटलच्या डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या लेटरपॅडवर उषाबाई गोणा या महिलेच्या नावे नशेच्या गोळ्या खरेदी करीत होता. परळी वैजनाथ येथील टिलकरी मेडिकल, तिरुमला मेडिकल गणेशनगर-पुणे, मौर्य मेडिकल अहमदनगर, दयानंद मेडिकल- परभणी या ठिकाणांहूनही त्याने गोळ्या खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लातूर येथील मधुमित्र मेडिकलमधून आरोपीने तीन ते चार वेळा नशेच्या गोळ्या खरेदी केल्याच्या पावत्या आणि सीसीटिव्ही फुटेज पथकाने हस्तगत केले आहेत. दरम्यान, आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी लोकाभियोक्ता ए. बी. येगावकर यांनी कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

तपासादरम्यान हावळे हा सेलू (परभणी) येथील शरयू हॉस्पिटलच्या डॉ.सुनील कुलकर्णी यांच्या लेटरपॅडवर उषाबाई गोणा या महिलेच्या नावे नशेच्या गोळ्या खरेदी करीत होता. अशी माहिती तपासात समोर आली आहे. सेलू येथील हॉस्पिटलचा आधार घेऊन हावळे नशेच्या बाजारात सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे या अनुषंगाने नशेच्या अवैध गोळ्या विक्रीत सेलू (परभणी) येथील आणखी कोणी सहभागी आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!