मुंबई दि.१५ : मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड आदी मान्यवरांनी इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या स्मारकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, त्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती देखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती. त्या प्रतिकृतीमध्ये काही बदल सुचवले होते. त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
या वेळी मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार, समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डॉ. आर मालाणी, सर जेजे आर्ट स्कूलचे प्रा.विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.
स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खरबदरी घ्यावी, असेही धनंजय मुंडे म्हणाले. हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, विषयतज्ज्ञ, सर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल; असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
दरम्यान, समुद्र किनार्याचे वातावरण, वातावरणातील होणारे बदल, पावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेऊन दैनंदिन कामांचा चार्ट बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना यावेळी श्री. मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
***