परभणी, दि.15 : खरिप हंगामासाठी यावर्षी जिल्ह्याला पिक कर्ज वितरणांचे 1105 एवढे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 190 कोटी पिक कर्ज वितरण झाले आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक बँकांनी पिक कर्ज प्रणालीद्वारे ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, अशा बँकांनी पात्र अर्ज मंजूर करुन शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी दिले.
पिक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी तालुक्यातील झरी आणि जिंतूर तालूक्यातील बोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिल हट्टेकर, जिल्हा सूचना अधिकारी पोटेकर यांची उपस्थिती होती.
गोयल म्हणाल्या की, शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी पिक कर्ज वेळेत मिळावे, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विकसीत केलेल्या पिक कर्ज प्रणालीचे राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या पिक कर्ज प्रणालीद्वारे आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 13 हजार 108 एवढे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आढावा घेण्यात येत आहे; परंतु अनेक बँका प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करत नसुन अर्ज प्रलंबित ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
खरिप हंगामासाठी 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपल्या अधिनस्त गावात शिबिरांचे आयोजन करुन शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावेत; तसेच प्राप्त झालेल्या अर्जावर त्याच दिवशी मंजूर किंवा नामंजूर बाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी वेळेत कर्ज वितरण करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी परभणी तालूक्यातील झरी आणि आणि जिंतूर तालूक्यातील बोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाला भेट देवून ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज व प्रलंबीत अर्ज, तसेच बँकेमार्फत ऑनलाईन कर्ज वितरण प्रणालीची देखील माहिती घेतले. तसेच बँक अधिकाऱ्यांचे प्रश्न ही जाणुन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद साधुन पिक कर्ज विषयक त्यांच्या समस्यांची माहिती घेवून त्यांना मार्गदर्शन केले. पिक कर्ज वितरणांचे ज्या बँकांकडे अर्ज सर्वात जास्त प्रलंबित आहेत, अशा 5 बँकाचा जिल्हाधिकारी आंचल गोयल या दर सोमवारी आढावा घेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर आपल्या मोबाईलवरुन किंवा नजीकच्या ‘आपले सरकार केंद्रा’वरुन पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी केले.
****