Police : पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे लोकार्पण
सहकार मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती
परभणी : येथील पोलीस मुख्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशी हॉलचे लोकार्पण सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार मेघनाताई बोर्डीकर, डॉ.राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे, सुरेश वरपुडकर, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मनोज शर्मा, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक जयंत मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, कुलगुरु डॉ. इंद्र मणी, सहायक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांची उपस्थिती होती.
या वेळी सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, पोलीस बांधव स्वतःचे कुटुंब, सुख-दुःख यांची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी सदैव अहोरात्र काम करतात. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात. प्रत्येक सणाला आपले पोलीस कर्तव्यासाठी रस्त्यावर दक्ष असतात म्हणून, आपण आनंदाने आणि सुखाने सर्व सण उत्सव साजरे करू शकतो, त्यांच्या या कार्याप्रती आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. यामुळे ते ज्याप्रकारे आपले रक्षण करतात त्यानुसार आपण त्यांच्यासाठी काहीतरी कल्याणकारी काम करणे अपेक्षित आहे. या उद्देशानेच पोलीस बांधवांच्या विविध कार्यक्रमासाठी बहुउद्दीशय हॉलचे लोकार्पण करण्यात आले आहे. याचा निश्चितच पोलीस बांधवांना फायदा होईल. तसेच औरंगाबादच्या धर्तीवर येथील पोलीस बांधवांसाठी निवासस्थाने उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. आपण नक्कीच याकरीता पाठपुरावा करु असेही श्री.सावे यावेळी म्हणाले. यावेळी सावे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी केले.