ज्ञानतीर्थ विद्यालयात दहीहंडी उत्साहात
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित ज्ञानतीर्थ विद्यालयात राधा कृष्ण वेशभूषा स्पर्धा व दहीहंडी शुक्रवारी (ता.१९) शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडली.‘गोविंदा आला रे’ च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, परीक्षक चंदा मेहता, मुख्याध्यापिका शालिनी शेळके माध्यमिक विभागाचे करणसिंह चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात श्रीकृष्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली. राधा कृष्ण वेषभूषा स्पर्धेत बालकलाकारांनी राधा व कृष्ण वेश परिधान केले होते. या स्पर्धेत शाळेतील बालवाडी ते दुसरीच्या 43 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
गोविंदा या गाण्यावर वेदिका लहानेने नृत्य सादर केले. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी लावतात. दही हंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. असे डॉ.अपूर्वा रोडगे म्हणाल्या. सूत्रसंचालन कालिंदा पवार यांनी तर आभार कैलास ताठे यांनी मानले.