पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ द्या
सेलू : कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखवली आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामनगाव येथील शेत शिवारात सततधार व अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मुग, हळद, फळबाग या पिकांचा समावेश आहे.
गुगळी धामनगाव हे गाव सेलू तालुक्यात कापूस, तूर व मुग या पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील बहुतांश लोक शेती आधारित व्यवसायावर अवलंबून आहेत. यावर्षी खरीप हंगामाची पेरणी झाल्यापासून शेत शिवारात सततधार व अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मुग ही पिके पिवळी पडली आहेत. अतिवृष्टीमुळे हानी पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गुगळी धामनगावच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदनावर डाॅ आशिष डख, तुकाराम महाजन, बाबाराव डख, बाबा काटकर, संतोष डख, माणिक डख, शाम डख, विठ्ठल डख, गणेश लोमटे, बालासाहेब डख, भगवान डख, दगडू मातने, हनुमान काटकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.