रसिकांसाठी पर्वणी : प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा सेलूत सोमवारी प्रयोग

रसिकांसाठी पर्वणी : प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा सेलूत सोमवारी प्रयोग

प्रवेश विनामूल्य : नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आयोजन, आस्वाद घेण्याचे रसिकांना आवाहन

सेलू जि.परभणी : प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा विलक्षण जीवनप्रवास साभिनय अभिवाचनातून उलगडणाऱ्या ‘नरहर कुरुंदकर – एका विचारवंतांची अपरिचित गोष्ट’ या अनोख्या नाटकाच्या प्रयोगाचा आस्वाद सेलूतील रसिकांना घेता येणार आहे. नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित (कै) श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेच्या वतीने, या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ नोव्हेंबर, सोमवारी सायंकाळी ५ वाजता सेलू येथील साई नाट्यगृहात हा नाट्यप्रयोग सादर होईल. या प्रयोगाला विनामूल्य प्रवेश आहे. कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. धर्म, समाजजीवन, साहित्य, कला, इतिहास आदी विषयांवरील तर्काधिष्ठित आणि परखड मांडणीसाठी ते ओळखले जात. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण. त्यासाठी कारणीभूत
बुद्धिप्रामाण्यवादातून आलेला त्यांचा सडेतोडपणा, त्यातही त्यांनी न सोडलेले ‘माणूसपण’ आदी बाबींचा वेध या नाट्यप्रयोगात घेतला आहे. सुमारे दोन तासांच्या मांडणीतून कुरुंदकरांच्या या विविध छटा उलगडतात. भक्कम संहितेसह कल्पक रेखाचित्रे, समायोजित पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि वाचक अभिनय यांसह हा प्रयोग फुलवलेला आहे. या प्रयोगाची संकल्पना व लेखन अजय आंबेकर यांचे असून त्यांनी यात अभिनयही केला आहे. त्यांच्यासह दिलीप पाध्ये, जिगीषा देशपांडे, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, स्वाती देशपांडे आदी कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. हा अनोखा नाट्याविष्कार सेलूतील रसिकांनी नक्की अनुभवावा, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिरादार, प्रा.ए.डी.कुलकर्णी आदींनी केले आहे.

हा अनोखा नाट्याविष्कार सेलूतील रसिकांनी नक्की अनुभवावा, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिरादार, प्रा.ए.डी.कुलकर्णी आदींनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!