अपघातग्रस्त : रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज; पण रुग्णवाहिकेचे दारच उघडेना 

अपघातग्रस्त : रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज; पण रुग्णवाहिकेचे दारच उघडेना 

मानवत येथील प्रकार, आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धावपळ

शेख अनवर

पाथरी : अत्याधुनिक आरोग्य सेवेचा तोरा मिरवणाऱ्या आरोग्य यंत्रणेचा जीवघेणा व्हिडिओ समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार प्राप्त व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील सराफ सुवर्णकार कारागीर शेख शफीक यांचा शहरालगत असलेल्या आष्टी फाट्याजवळ गंभीर अपघात झाल्यानंतर एम.एच १४ सी.एल ०९९६ या क्रमांकाची पाथरीच्या आरोग्य केंद्रातील नॅशनल ॲम्बुलन्स सर्विस १०८ ही गाडी मागवण्यात आली होती. पेशंट सिरीयस असताना तसेच आपातकालीन परिस्थितीत त्याला व्हेंटिलेटरची गरज असल्याने मानवत येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे ॲम्बुलन्स थांबून व्हेंटिलेटर लावण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता किमान अर्धा तास दरवाजा उघडलाच नसल्याचे समोर आले आहे. जीवनमरणाची परिस्थिती निर्माण झालेली असताना. सदरील ॲम्बुलन्सचा दरवाजा न उघडल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धावपळ पाहायला मिळाली. यानिमित्ताने आरोग्य सेवेचे धांडोळेनिघत आहेत. राज्य शासनाच्या वतीने अनेक नवनवीन उपाययोजना केल्या जात असताना फक्त ऑफिस मध्ये पंख्याखाली बसून लाखो रुपयाचा पगार घेणाऱ्या पाथरी येथील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या निमित्ताने जग जाहीर होताना दिसत आहे. अपघातग्रस्त पेशंटला परभणी किंवा नांदेडला घेऊन जाण्याची घाई असताना आणि व्हेंटिलेटरची अत्यावश्यकता असताना नागरिकांच्या जीवाशी हा कोणता खेळ आरोग्यसेवा व महाराष्ट्र शासन खेळत आहे? असा प्रश्न यानिमित्ताने सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या सदरील पाथरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणीही परभणी जिल्ह्यातून जोर धरत आहे. प्राप्त झालेल्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांती व उपस्थित लोकांनी नाईलाजास्तव लाथा घालूनही ॲम्बुलन्सचा दरवाजा उघडत नसल्याचे गंभीर चलचित्र समोर आलेले पाहायला मिळत आहे. सध्या पेशंटची तब्येत नाजूक असल्याचे कळते. अपघातग्रस्त शफिक शेख यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. पाथरीचे सराफ सुवर्णकार अमित उदावंत यांनी निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीत मोलाची मदत केल्याचेही समोर आले आहे.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!