आत्महत्या,की घातपात : विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील घटना, शेळ्या चारायला गेला. परतला नाही
देवगावफाटा : सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह गुरूवारी (२४ नोव्हेंबर) विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे नाव नितीन उर्फ पप्पु किसन कामिटे असे असून, तो बोरकिनी येथील रहिवासी होता. सोमवारी शेळ्या चारण्यासाठी घरा बाहेर पडला होता, परंतु घरी उशीरापर्यत परतला नसल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला. मात्र कोठेही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, गुरुवारी नरसापुर शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, पोहेका कोंडरे, वाघमारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार आत्महत्या की, घातपात आहे याची चर्चा परिसरात होत आहे. पोलिस तपास करित आहेत.