सेलूतील नूतन महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.उत्तम राठोड; विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
सेलू (जि.परभणी) : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.उत्तम राठोड यांची निवड झाली आहे. गुरुवारी, १३ जुलै रोजी प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सदस्य प्रकाशचंद बिनायके, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर,अजीज खाँ पठाण, राजेश लोया यांची उपस्थिती होती. डॉ.राठोड गेल्या २९ वर्षापासून इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील इतिहास विषयक परिषद, चर्चासत्र, परिसंवादात सहभाग नोंदविला आहे.
‘महाराष्ट्राच्या विकासात श्री वसंतराव नाईक यांचे योगदान ‘ या विषयावर त्यांनी पीएचडी संपादन केलेली आहे. त्यांची इतिहास संशोधनविषयक दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध परिषदांतून साठ संशोधनात्मक शोध निबंध डॉ.राठोड यांनी सादर केले आहेत. पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून त्यांना दहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील इतिहास संशोधन केंद्राचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. सध्या प्राचार्य डॉ.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ४० विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. प्राचार्य पदी निवडीबद्दल डॉ.राठोड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.