District Collector : परभणीचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वीकारला पदभार
आंचल गोयल यांच्यासह गावडे यांना जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिल्या शुभेच्छा
परभणी : परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शनिवारी (२२ जुलै रोजी माजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्याकडे पदभार सोपविला. नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची शासनाने परभणी जिल्हाधिकारी पदावर बदली केली. त्यानुसार शनिवारी त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती दाभाडे, उपजिल्हा निवणूक आधिकरी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा आधिकारी गोविंद रणविरकर, उपमुख्य कार्यकाधिकारी डॉ.संदिप घोन्सिकर, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनियुक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, माजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्ह्यात विविध उपक्रम आणि योजना राबवून त्यांच्या कार्यकाळ यशस्वी केला आहे. येणाऱ्या काळात आपण त्यांच्या योजना, उपक्रम पुढे घेवून जात परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वांनी प्रयत्न करु या ! याकरीता निश्चितच आपण सर्वजण मिळून काम करु. जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांनी जी साथ श्रीमती गोयल मॅडम यांना दिली तशीच साथ सर्वांची मला द्यावी. जिल्ह्यातील नागरिकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वजण एकजूटीने प्रयत्न करु,असे अवाहन त्यांनी केले.
माजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या की, परभणी जिल्हाधिकारी या पदावर कार्य करतांना मला खुप काही शिकायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय ही माझी कर्मभूमी असून, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी माझ्यासाठी माझे कुटूंब होते, आणि कुटूंबातील प्रत्येक घटकाची काळजी घेणे ही माझी जबाबदारी होती. जिल्हाधिकारी म्हणुन माझ्यावर जी जबाबदारी होती ती पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीने आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मला साथ दिली म्हणून मी माझा कार्यकाळ यशस्विरीत्या पूर्ण करु शकले. परभणीकरांनी दिलेले प्रेम आणि सहकार्य हे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असे सांगुन त्यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रारंभी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर नवनियुक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे स्वागत करण्यात आले. श्रीमती दाभाडे यांनी माजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा परिचय करून दिला.
प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सोबत काम करतांना आलेल्या अनुभव सांगितले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी यांची उपस्थिती होती.