शेतकऱ्यांबद्दलची कृतज्ञता साहित्यातून उमटावी : रावसाहेब कसबे; अमृतमहोत्सवानिमित्त कवी केशव बा.वसेकर यांचा परभणीमध्ये सन्मान
परभणी : कविता जगण्याचा अर्क असतो. कविता जगण्याचे सार्थक असते. केशव बा. वसेकरांनी कवितेशी संघर्ष केला. त्यांना कितीही छळले तरी त्यांनी तिच्यावर न रागवता केशव बा.वसेकर स्वतः कविता झालेला माणूस आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे ( नाशिक ) यांनी केले. केशव बा.वसेकर अमृतमहोत्सव समारंभात कसबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी, चित्रकार भ.मा.परसवाळे होते. सत्कारमूर्ती केशव बा.वसेकर, ताराबाई वसेकर, कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा.विश्वास वसेकर, कवी इंद्रजित भालेराव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले की, ‘ परभणीची भूमी ही सुपिक आहे. परभणीतील साहित्यिक कवी केशव बा.वसेकर, कवी इंद्रजित भालेराव, कथाकार डॉ.आसाराम लोमटे यांनी परभणी साहित्याचं केंद्र केले आहे. केशव बा.वसेकरांसारख्या उगवलेल्या साहित्यिकांना मोठे करणे, ही तुम्हा परभणीकरांची जबाबदारी आहे. आपला शेतकरी प्रामाणिक आहे. शेतकऱ्यांबद्दलची कृतज्ञता आपल्या लेखनातून यायला हवी, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. प्रा. भगवान काळे यांनी शब्दांकन केलेल्या मानपत्राचे वाचन अरूण चव्हाळ यांनी केले. सुत्रसंचलन त्र्यंबक वडसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नवीन वसेकर यांनी केले. कार्यक्रमास साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन वसेकर विष्णू सोळंके नवीन वसेकर कृष्णा सोळंके यांच्यासह अमृत महोत्सव सोळा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिभा हे माणसांनी कमावलेलं कौशल्य आहे. समाजात चाललेला उत्पात, वाईट गोष्टी यांच्या बद्दल अंतकरणात विद्रोह आहे. तो शब्दातून व्यक्त करतो तो साहित्यिक, चित्रातून व्यक्त करतो तो चित्रकार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कलेतून व्यक्त होत असतो आणि या प्रतिभेतूनच खऱ्या अर्थाने जगण्याला अर्थ प्राप्त होतो, असेही ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी नमूद केले.