मराठवाडा मुक्तिसंग्राम : प्रेरणादायी व भविष्याचा वेध घेणारा लढा : प्रा.आबासाहेब देशपांडे
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
सेलू : मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हा प्रेरणादायी व भविष्याचा वेध घेणारा आहे असे विचार प्रसिद्ध विचारवंत प्रा.धु.ना(आबासाहेब) देशपांडे यांनी सेलू येथील मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा या विषयावर आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेने लोकशाही स्वातंत्र्यासाठी जो अभुतपूर्व लढा दिला त्याचे स्मरण व्हावे व त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श सर्वांसमोर उभा राहावा या उद्देशाने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित सेलू येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने दिनांक १५ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेपाच वाजता जाहीर व्याख्यान व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.येथील नूतन विद्यालयाच्या रा.ब गिल्डा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी होते तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रा. आबासाहेब देशपांडे,सत्कारमूर्ती जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगीरथजी गेना,विवेकानंद विद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, विवेकानंद विद्यालयाचे स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, स्वामी रामानंद तीर्थ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविकात उपेंद्र बेल्लूरकर यांनी विवेकानंद शैक्षणीक संकुलाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती व या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.सहशिक्षक गजानन साळवे यांनी पद्य सादर केले.
या कार्यक्रमाच्या औचित्य साधून मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी असणारे सेलूचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भगीरथजी गेना यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना देशपांडे पुढे म्हणाले की ,मराठवाडा मुक्ती संग्राम लढा अन्यायाच्या विरोधात व असंतुलित तसेच निर्बल की लढाई बलवान से असाच होता.निजाम हा जगातील दोन नंबरचा श्रीमंत असलेला परंतु अत्यंत लोभी असा होता तसेच लोभी मनोवृत्तीचे अधिकारी होते. जनतेची पिळवणूक करणारे कायदे निजामाने केले होते . निजामाने त्यावेळी हिंदू प्रजेवर अनेक कठोर बंधने घातली होती.त्याकाळी नवीन मंदिर बांधकामाला परवानगी नव्हती तर जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची परवानगी देखील नव्हती.जाणून-बुजून हिंदू समाजावर अत्याचार सुरू होता आर्य समाज, हिंदू महासभा व स्टेट काँग्रेस यांनी अत्याचाराच्या विरोधात लढा सुरू केला. सोलापूर ही जन्मभूमी सोडून मराठवाडा व हैदराबाद हीच कर्मभूमी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी या विभागाच्या मुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले आहे. भाषेचा व पेहराव याचा परिणाम संस्कृतीवर होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या एकमेव वंदे मातरम या गीताचा मुक्तिसंग्राम चळवळीसाठी मोठा फायदा झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली 1938 ते 1948 या कालावधीत जुलमी निजाम राजवटीच्या विरोधात हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला. या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील मोठे योगदान आहे. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 565 पैकी तीन संस्थांने भारतात सामील होण्यासाठी अनुकूल नव्हते त्यावेळी निजामाने देखील सामील होण्यास विरोध केला होता. त्यावेळी सरदार वल्लभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ॲक्शन सुरू केली व १७ सप्टेंबर रोजी शेवटी निजाम शरण आला आणि मराठवाडा खऱ्या अर्थाने मुक्त झाला. परंतु मराठवाड्याचा अजूनही अनुशेष भरून निघाला नाही व पाहिजे तेवढा विकास मराठवाड्याच्या वाट्याला अजूनही आलेला नाही अशी खंत यावेळी देशपांडे यांनी व्यक्त केली.
यासाठी तरुणांनी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. शरद कुलकर्णी यांनी निजामाच्या राजवटीत हिंदूंवर होणारा अन्याय उदाहरणासह सांगितला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले तर करुणाताई कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले .सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक अनिल कौसडीकर, रागिनी जकाते, विनोद मंडलिक,शंकर राऊत, अभिषेक राजूरकर,काशिनाथ पांचाळ, दिपाली पवार,स्वप्नाली देवडे ,शारदा पुरी,शालवी जोशी, रसिका बावणे,सोनाली जोशी,चेतन नाईक,चंदू कव्हळे यांनी प्रयत्न केले.
Voice of Media : मराठवाड्यातील पत्रकारांना संधी; राज्य कार्यकारिणी जाहीर