वाचन प्रेरणा दिन : विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रूजविण्याची गरज
परभणीतील शारदा महाविद्यालयात अक्षर भेट उपक्रमांतर्गत कार्यक्रम
परभणी : मराठवाडा साहित्य परिषद परभणी व शारदा महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार रविवारी, १५ ऑक्टोबरला करण्यात आली. या वेळी शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आणि कौशल्य हे पुस्तकांच्या वाचनातून मिळते. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रूजविला पाहिजे, असे मत विविध वक्त्यांनी मांडले.
शारदा महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.श्यामसुंदर वाघमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकार डॉ.आसाराम लोमटे, मराठवाडा साहित्य परिषद, परभणी शाखेच्या अध्यक्ष सरोज देशपांडे, प्रसिद्ध लेखक बाबा कोटंबे, आदर्श शिक्षक माणिक पुरी, शरद ठाकर, मारूती डोईफोडे यांची उपस्थिती होती. या वेळी वक्त्यांनी ‘ माझे वाचन’ या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या. पुस्तक माणसांना सुसंस्कृत, समृद्ध करतात. पुस्तकांमुळे माणसांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. पुस्तके माणसांची जग, माणसांकडे बघण्याची दृष्टी व्यापक करतात, असे मतही मांडण्यात आले. याप्रसंगी शिक्षक पुरस्कारप्राप्त माणिक पुरी, शरद ठाकर, मारुती डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. कार्यवाह प्रा.भगवान काळे यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ.भिमराव खाडे, केशव खटींग, प्रा.सावित्रा चिताडे, साहित्यिक, शिक्षक आदींची उपस्थिती होती. प्रा.सचिन खडके, ग्रंथापाल डॉ. प्रशांत मेणे, त्र्यंबक वडसकर, प्रा. हनुमान व्हरगुळे, सुरेश जयपूरकर, प्रा.अविनाश पांचाळ, अरविंद सगर, गंगाधर गायकवाड यांनी पुढाकार घेतला.