Street Dogs : चिमुकल्यावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; सेलूतील घटना, पालिका प्रशासन ढिम्मच
मोकाट कुत्री वारंवार लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. यामुळे पालकांना काळजी वाटत असून मुलांना एकटे सोडणेसुद्धा अवघड झालेले आहे. याबाबत अनेक वेळा नगरपालिकेला लेखी निवेदन व तोंडी सांगूनसुद्धा पालिका प्रशासन कोणतीही उपायोजना करीत नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तसुद्धा होत नाही. मुख्याधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
सेलू जि.परभणी : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सेलू शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. सोमवारी, १३ नोव्हेंबररोजी सेलू नगरपालिकेच्या असलेले जुन्या कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका सात वर्षीय चिमुकल्यावर चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. आठवडाभरात या भागातील ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र,मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन ढिम्मच असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या बाबत माहिती अशी की, शेख नोमान रफिक (सात वर्ष) हा बालक घरी जात असताना, चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्या ठिकाणाहून मोटर सायकलवर जात असलेले जहीर अब्बास हाश्मी व शेख आसिफ शेख आरिफ या दोन जणांनी प्रसंगावधान राखून धावत जात, त्या मुलाचा मोकाट कुत्र्यापासून बचाव केला. चिमुकल्याचा जीव वाचविला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमला. जमावाने नगरपालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मोकाट कुत्री वारंवार लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. यामुळे पालकांना काळजी वाटत असून मुलांना एकटे सोडणे सुद्धा अवघड झालेले आहे. याबाबत अनेक वेळा नगरपालिकेला लेखी निवेदन व तोंडी सांगूनसुद्धा पालिका प्रशासन कोणतीही उपायोजना करीत नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तसुद्धा होत नाही. मुख्याधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत,असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.