विज्ञान केंद्राच्या हालचालींना वेग; सेलू्तील श्रीराम प्रतिष्ठानचा पुढाकार
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात बैठक, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.संजय रोडगे आणि वैज्ञानिकांमध्ये चर्चा
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई व भारतातील ख्यातनाम वैज्ञानिक, शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू येथे विज्ञान केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संकल्पना रुजवण्यासाठी कृतिशील उपक्रमांचा प्रसार व प्रचार कसा करता येईल, यासह विविध विषयांवर डॉ.अनिल काकोडकर यांनी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र फायदेशीर ठरेल. – डॉ.संजय रोडगे, अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान, सेलू जि.परभणी
सेलू जि.परभणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने नवीन विज्ञान केंद्र स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (१४ डिसेंबर) मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्रामध्ये या संदर्भात एक बैठक झाली. ख्यातनाम अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, नेहरू विज्ञान केंद्राचे प्रमुख उमेश कुमार रस्तोगी, एन.डी.देशमुख, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ.सुनील मोडक यांच्यासह मान्यवर वैज्ञानिकांची प्रमुख उपस्थिती होती.
वैविध्यपूर्ण अप्लिकेशन्सच्या प्रगती, प्रसार आणि संवर्धनासाठी तसेच समाजातील विविध समस्या आणि विकासात्मक कामांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने श्रीराम प्रतिष्ठान नेहमीच नवीन उपक्रमांद्वारे मराठवाड्यात कार्य पुढे नेत आहे. याच अनुषंगाने नवीन विज्ञान केंद्र स्थापनेसाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. विज्ञान शिक्षक नारायण चौरे व पर्यवेक्षक अर्जुन गरुड उपस्थित होते.