कॅनव्हासवर साकारले कल्पनाविश्व; श्रीरामजी भांगडिया चित्रकला स्पर्धेला सेलूत मोठा प्रतिसाद
श्रीरामजी भांगडीया जयंतीनिमित्त नूतन विद्यालयाचा उपक्रम
मी मित्रांसोबत पतंग उडविताना, माझे घर आणि माझा टॉमी, मित्र आणि मी बागेत फिरताना, माझा वाढदिवस, प्राणी संग्रहालयास भेट, भारतीय सैनिक एक प्रसंग आदी विषयांवर स्पर्धकांनी आपल्या कल्पनेतील विश्व कॅनव्हासवर साकारले.
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयाच्या चित्रकला विभागाच्यावतीने श्रीरामजी भांगडीया जयंती निमित्त सोमवारी (१८ डिसेंबर) इयत्ता पहिली ते चौथीसाठी रंगभरण, तर इयत्ता पाचवी ते दहावीसाठी चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेचे सोळावे वर्ष होते. या वर्षीही रंगभरण, चित्रकला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. तिन्ही गटात शहरातील चारशे बाल चित्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी मी मित्रांसोबत पतंग उडविताना, माझे घर आणि माझा टॉमी, मित्र आणि मी बागेत फिरताना हे विषय तर आठवी ते दहावीसाठी माझा वाढदिवस, प्राणी संग्रहालयास भेट, भारतीय सैनिक एक प्रसंग हे विषय चित्र काढण्यासाठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, नूतन कन्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहीदास मोगल, नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक चित्रकला विभागप्रमुख किशोर कटारे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी, तर आभार प्रदर्शन फुलसिंग गावित यांनी केले. कांचन कोरडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ.काशिनाथ पल्लेवाड,अनंतकुमार विश्वंभर, केशव डहाळे, गोविंद रामपूरकर, अरूण रामपुरकर आदींनी परिश्रम घेतले.