संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत संमेलन : बासरी वादन, गायन, नृत्याविष्काराला सेलूकरांची उत्स्फूर्त दाद
साई नाट्य मंदिरात संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत संमेलन, आज सांगता
सेलू : संगीतरत्न कै.हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, ३० डिसेंबर रोजी झाले. ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनाने संगीत संमेलनाची सुरूवात झाली. उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, डॉ.रामराव रोडगे, अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, माजी प्राचार्य शरद कुळकर्णी, यशवंतराव चारठाणकर, महेश खारकर, मोहन खापरखुंटीकर, अजित मंडलिक, श्रीकांत उमरीकर, मल्हारीकांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते हरिभाऊ चारठाणकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले. प्रारंभी जेष्ठकवी गौतम सूर्यवंशी लिखित तर शांतीभुषण चारठाणकर यांनी स्वरबद्ध केलेले “सूर ज्यांचा श्वास होतो, संगीताची साधना” गीत श्रृती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थी वृंदाने सादर केले.
बासरीच्या सूरावटींनी श्रोते मंत्रमुग्ध !
महोत्सवाचा शुभारंभ मराठवाड्यातील उदयोन्मुख बासरीवादक ऐनोद्दिन वारसी यांच्या बासरीवादनाने झाला. ऐन मावळतीला बासरीसारख्या सुशीरवाद्यामुळे साईनाट्य मंदिरातील वातावरण भारल्या गेले. सेलूकर श्रोते मंत्रमुग्ध झाले. पं.रोणू मुजूमदार यांचे शागिर्द असलेल्या ऐनोद्दिन यांनी प्रथम राग ‘यमन’ सादर केला.बीनकारी अंगाने रागाची बढत करीत आपल्या मैहर घराण्याला अनुरूप प्रस्तुतीकरण केले.त्यांना तबलासंगत युवा तबला वादक व सेलू शहराचे भूमिपुत्र असलेल्या गजानन धुमाळ याने केली. सहकलावंत म्हणून अनहद वारसी, श्रीनिवास लंकावार यांनी साथ दिली. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.
ओडिसीचा लोभस नृत्याविष्कार…
महागामी गुरूकुल गेली २८ वर्षे छत्रपती संभाजीनगर मध्ये निष्ठेने कथ्थक आणि ओडिसी नृत्याचे शिक्षण गुरूकुल पद्धतीने गुरू पार्वती दत्ता यांच्या शिष्या शीतल भामरे, ऐश्वर्या मुंदडा, आद्या शिंदे यांनी यांनी महोत्सवात अप्रतिम असा नृत्याविष्कार रसिकांसमोर सादर केला. रविंद्रनाथ टागोरांची रचना जागो नयन, कल्याण पल्लवी, जयदेवाची अष्टपदी व दशावतार कथा सादर केली. सेलू सारख्या गावात पहिल्यांदाच ओडिसी नृत्य पहायला मिळाले, डोळे तृप्त झाले अशा प्रतिक्रिया रसिकांमध्ये उमटल्या.
विश्वनाथ दाशरथेंचा रंगलेला कौशिक रंजनी
संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचा पहिल्या दिवशीचा समारोप विश्वनाथ दाशरथे याच्या रसरशीत गायनाने झाला.रसिकांनी त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली. साथसंगत सागर पटोकर आणि शांतीभुषण देशपांडे यांनी केली.
आज सांगता
३१ डिसेंबररोजी दुपारी स्थानिक कलावंत पूजा तोडकर, सीमा दडके, शंतनू पाठक, सच्चिदानंद डाखोरे, यशवंत चारठाणकर यांचे गायन आहे. सायंकाळ सत्रात पांडुरंग पवार (पुणे) यांचे तबला सोलो वादन, हेमांगी नेने (हैदराबाद) यांचे गायन होईल. तर ख्यातकीर्त गायक कृष्णेद्र वाडीकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवातील विविध कार्यक्रमांना शांतीभुषण चारठाणकर, सागर पाटोकर, यश खडके, गजानन धुमाळ साथसंगत करणार आहेत. रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे