चाकूहल्ला प्रकरणी दोघांवर गुन्हा; आरोपी फरार, सेलू शहरातील घटना
सेलू : शहरातील नाथनगर येथील अभिषेक गणेश घुले (वय २२) मैत्रिणीसोबत यात्रेत फिरण्याच्या रागातून, राहत्या घरातून त्यास दुचाकीवर बसवून सातोना रोडवरील एका पार्कमध्ये नेले. त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘त्या’ घटनेत रविवारी (दि.७) दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
अभिषेक गणेश घुले हा व्यवसायानिमित्त पुणे येथील शिक्रापूर येथे राहतो. परंतु सेलू हे त्याच मूळगाव असून येथे सुरू असलेल्या श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त तो देवदर्शनासाठी आला होता. मैत्रिणीसोबत यात्रेत फिरण्याचा राग मनात धरून लक्ष्मण मोरे याने शनिवारी (दि.६) राजगडनगर येथून आभिषेक घुले यास तुला बोलायचे आहे म्हणून दुचाकीवर बसवून सातोना रोडवरील एका पार्कमध्ये नेले. त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. लक्ष्मण मोरे याने थेट धारदार चाकू काढून अभिषेक घुले याच्या पाठीवर मारला. दुसरा वार त्याने चुकविला व अभिषेक त्याठिकाणावरून जीव वाचवित पळून गेला. त्यानंतर लक्ष्मण मोरे हा घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी उपस्थितांनी आभिषेक घुले यास सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. पंरतु चाकु पाठीत अडकलेला पाहून डॉक्टरांनी परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लगेच परभणी येथे अभिषेक घुले यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढला. सध्या अभिषेक घुले यांची प्रकृती स्थिर असून सेलू पोलीस ठाण्यात अभिषेक घुले याच्या जवाबावरून आरोपी लक्ष्मण मोरे व त्याचा सहकारी मित्र यांच्यावर कलम ३०७, ३६३, ३४ भादंवि आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणी कुणाला अटक झाली नसून घटनास्थळावरून एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.