स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात; रोडगे प्रिन्स इंग्लिश, प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच युवादिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊंची वेशभूषा केली होती व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी भाषणाव्दारे त्यांच्या कार्याची माहिती दिली. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अशोक अंभोरे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
डॉ.संजय रोडगे यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंदांचे विचार आजही लोकांच्या हृदयात आहेत. स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक, समाजसुधारक होते. ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली. तसेच गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे अशोक अंभोरे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्पना भाबट, तर आभार प्रदर्शन अर्जुन गरुड यांनी केले. प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर शिक्षकवृंद उपस्थित होते.